कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली, पोलिसांच्या घरांचा प्रश्न, राज्यातील दुष्काळ असे अनेक प्रश्न उग्र झालेले असताना पोलिसांसाठी ‘महाराष्ट्र पोलिस संगीत प्रशिक्षण केंद्र’ सुरु करण्याचा घाट गृह आणि पोलिस प्रशासनातील उच्चपदस्थांनी घातला आहे. या केंद्रासाठी दौंडमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या तब्बल ७५ एकर जमिनीची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या ‘संगीत’ प्रेमामागील नेमके रहस्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसी मग्रुरी, भंडारा येथील तीन मुली बेपत्ता झाल्याची साधी तक्रारही तातडीन न नोंदवणे,ठाणे जिल्ह्य़ात अनधिकृत बांधकामांना संरक्षण, अशा अनेक प्रकरणांमुळे पोलीस दलाच्या अकार्यक्षमतेचे िधडवडे निघत आहेत. पण ‘रोम जळत असताना नीरो फीडल वाजवत होता’, या उक्तीप्रमाणे गृह आणि पोलीस विभागातील उच्चपदस्थांचे अचानक संगीत प्रेम उफाळून आले आहे. या संगीत अकादमीसाठी तब्बल १०० कर्मचाऱ्यांच्या पदांची मागणी करण्यात आली आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी लागणार आहे.
पोलिस दल अपुरे आहे, पोलिसांच्या घरांचा प्रश्न बिकट असून अनेकांना घरे नाहीत. ज्यांना आहेत, त्यांची अवस्था वाईट आहे.असे असतानाही संगीत अकादमीचा हट्ट, त्यासाठी लागणारी प्रचंड जमीन तसेच एवढा कर्मचारी वर्ग व निधी कशासाठी असे अनेक प्रश्न या प्रस्तावामुळे उपस्थित झाले आहेत. राज्यात दुष्काळ व अन्य प्रश्न असताना हा घाट कोणाच्या फायद्यासाठी व हौसेसाठी घातला जात आहे, असा सवाल युवा जनता दलाचे अध्यक्ष नाथा शेवाळे यांनी केला आहे. सध्या पोलिसांकडे जिल्हा मुख्यालय व पोलिस प्रशिक्षण केंद्रात बँडपथक असते व त्यांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीच भरती करणे आवश्यक असताना प्रशिक्षणासाठी सरकारने खर्च करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलिसांना संगीताचे धडे!
कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली, पोलिसांच्या घरांचा प्रश्न, राज्यातील दुष्काळ असे अनेक प्रश्न उग्र झालेले असताना पोलिसांसाठी ‘महाराष्ट्र पोलिस संगीत प्रशिक्षण केंद्र’ सुरु करण्याचा घाट गृह आणि पोलिस प्रशासनातील उच्चपदस्थांनी घातला आहे.
First published on: 07-04-2013 at 02:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music lesson for maharashtra police