मुंबई : अवीट गोडीची भावगीते, भक्तिगीते, जाहिरातींची अनोखी दुनिया, नाटक, चित्रपट आणि मालिकांचे संगीत अशा विविध प्रांतांमध्ये मुशाफिरी करणारे संगीतकार अशोक पत्की यांचे सूर आता थेट ऑस्ट्रेलियात घुमणार आहेत. ‘नटराज प्रोडक्शन’तर्फे अशोक पत्की यांच्या ‘सप्तसूर माझे’ कार्यक्रमाचे ऑस्ट्रेलियात आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे परदेशातील मराठी आणि अमराठी रसिक प्रेक्षकांनाही या संगितांचा आनंद घेता येणार आहे.
हेही वाचा – “आता हे स्वतःच जोड्यानं आपलं थोबाड फोडून घेणार आहेत का?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुळचे महाराष्ट्रातील अनेक नागरिक कामानिमित्त परेशात स्थायिक झाले आहेत. ही मंडळी आपापल्या परिने मराठी कला, संस्कृती जपण्याचा कायम प्रयत्न करीत असतात. त्यापैकीच एक प्रशांत तुपे. ‘नटराज प्रोडक्शन’तर्फे ते ऑस्ट्रेलियातील विविध शहरांमध्ये हिंदी, मराठी गाण्यांचा कार्यक्रम करतात. त्यांनी ९ एप्रिल ते ३ मे २०२३ या कालावधीत अशोक पत्की यांच्या ‘सप्तसूर माझे’ कार्यक्रमाचे चार शहरांमध्ये सात ठिकाणी आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक पत्की लिखित ‘सप्तसूर माझे’ पुस्तकही सातासमुद्रापार पोहोचणार आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी, पर्थ, ॲडलाईट, मेलबर्न या चार शहरांमध्ये ‘सप्तसूर माझे’चे सात कार्यक्रम होणार असून, तेथील मराठी रसिकांच्या वतीने सहस्रदर्शन सोहळ्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.