मुंबई : कथेला समर्पक असणारे संगीत जेव्हा प्रेक्षकांच्या मनात रुजते, तेव्हा ते आपसूकच गुणगुणायला भाग पाडते. जेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीला गाणी उतरतात, तेव्हा चित्रपटही प्रचंड गाजतो, हे समीकरण गेल्या काही वर्षांत पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आजवर सुमधुर संगीताच्या जोरावर बहुसंख्य चित्रपटांनी रसिकप्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या अनुषंगाने अनेक प्रतिभावान संगीतकारांनी चित्रपटसृष्टीवर विशेष छाप पाडली आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अविनाश चंद्रचूड आणि विश्वजीत जोशी म्हणजेच ‘अविनाश – विश्वजीत’ या प्रसिद्ध जोडीचाही समावेश आहे. अनेक मराठी चित्रपटांना ‘सुरेल’ करणारी अविनाश-विश्वजीत संगीतकारांची जोडी २०२५ मध्ये वैविध्यपूर्ण सुमधुर गीतांची रसिकप्रेक्षकांना भेट देणार आहेत.
अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केलेले वैविध्यपूर्ण चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यासोबतच त्यांच्या सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी सुद्धा रसिकप्रेक्षकांना महाराष्ट्रातील विविध शहरांतून घेता येणार आहे. नव्या वर्षातील पहिली सांगीतिक मैफल शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे रात्री ८.४५ वाजता रंगणार आहे. वसुंधरा संजीवनी या संस्थेच्या एका खास सामाजिक उपक्रमाअंतर्गत ही सांगीतिक मैफल आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई – पुणे – मुंबई’ या चित्रपटाच्या माध्यमातून नावारुपाला आलेल्या अविनाश – विश्वजीत या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली विविध गाणी रसिकप्रेक्षकांना गुणगुणायला भाग पाडले. कधी तू, का कळेना, कधी तू रिमझिम झरणारी बरसात, ओल्या सांजवेळी, हृदयात वाजे समथिंग, साथ दे तू मला या प्रेमगीतांसोबत असा हा धर्मवीर, भेटला विठ्ठल माझा, खंबीर तू हंबीर तू, मदनमंजिरी, हे शारदे आदी रसिकप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली गाणी त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत.