प्रभाग फेररचना, आरक्षणाचा परिणाम; तिकिटासाठी ‘एमआयएम’कडे मोर्चा

फेररचनेनंतर प्रभागांच्या बदललेल्या सीमा आणि अन्य जाती-धर्माच्या मतदारांचा प्रभागात झालेला समावेश, परिणामी फुटलेली ‘व्होटबँक’ यामुळे विद्यमान मुस्लीम नगरसेवक आणि निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले मुस्लीम नेते अडचणीत आले आहेत. फेररचनेमुळे काही मुस्लीमबहुल प्रभागांतील मतदारांची संख्या घसरली आहे. आता काँग्रेस, समाजवादी पक्षांनी अन्य धर्मीय इच्छुकांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे बिथरलेल्या मुस्लीम उमेदवारांनी तिकिटासाठी ‘एमआयएम’कडे मोर्चा वळविला आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघातून एमआयएमच्या उमेदवाराच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला होता. पालिका निवडणुकीमध्ये एमआयएम मुंबईत हातपाय पसरण्याची शक्यता तेव्हापासूनच वर्तविण्यात येत होती. मुंबईमध्ये भेंडीबाजार, पायधुनी, डोंगरी, मदनपुरा, नागपाडा, आग्रीपाडा, शिवडी, भायखळा, माहीम, धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, ओशिवरा, मालाड, अ‍ॅन्टॉप हिल, कुर्ला, गोवंडी, ट्रॉम्बे, देवनार, मानखुर्द, घाटकोपर आदी भागांमध्ये मुस्लीमबहुल वस्त्या आहेत. या वस्त्या काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या मतपेढय़ा बनल्या आहेत. वर्षांनुवर्षे या प्रभागांमधून मुस्लीम नगरसेवक निवडून येत आहेत. मात्र प्रभाग फेररचनेनंतर या परिसरातील चित्र बदलले आहे. आसपासच्या मराठी-अमराठी वस्त्याही प्रभागाला जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुस्लीम मतदारांची संख्या कमी झाली आहे. काही ठिकाणी मूळ प्रभागाचे दोन भाग पडले असून ते लगतच्या प्रभागांमध्ये विभागले गेले आहेत. त्याचा फटका मुस्लीम उमेदवारांना बसण्याची चिन्हे आहेत.

पालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत २० मुस्लीम उमेदवार विजयी झाले होते. त्यात सात नगरसेविका आणि ११ नगरसेवकांचा समावेश होता. काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (२), समाजवादी पार्टी (५), शेकाप (१) अशी मुस्लीम नगरसेवकांची स्थिती आहे. तसेच ३ अपक्ष मुस्लीम नगरसेवकांचाही त्यात समावेश आहे.मुस्लिमांसह अन्य धर्माची मते मिळवू शकेल अशा उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे निवडणुकीत विजयी होऊन पालिकेत दाखल होणारे मुस्लीम नगरसेवक संभ्रमात पडले आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारली तर इतर पक्षांतून उमेदवारी मिळविता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे.

यांना फटका बसण्याची शक्यता

प्रभाग फेररचना आणि आरक्षण बदलाचा वकारुन्नीसा अन्सारी, याकूब मेमन, अश्रफ आझमी, दिलशाद आझमी, रईस शेख आदींना फटका बसल्याची चर्चा आहे. गोवंडी परिसरातील पाच प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. आरक्षणामुळे गोवंडीमधील शास्त्रीनगर, कमला रमननगर येथील प्रभाग सोडून रईस शेख आग्रीपाडा परिसरातील प्रभागाकडे वळले आहेत. समाजवादी पार्टीनेही त्यांना येथून उमेदवारी जाहीर केल्याने त्यांचा प्रश्न सुटला आहे. परंतु अन्य मुस्लीम नगरसेवक-नगरसेविकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

मतदारांशी सतत संपर्कात राहणारा नगरसेवक वा इच्छुक उमेदवार निवडणुकीत विजयी होतो. त्यामुळे प्रभागात दांडगा जनसंपर्क असलेल्यांना उमेदवारी दिल्यास फायदा होऊ शकतो. दुसऱ्या परिसरातील उमेदवार दिल्यास त्याच्या पराभवामुळे फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोहसिन हैदर, काँग्रेस नगरसेवक