लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : शेळी पालनाऐवजी फळ आणि पालेभाज्यांची पिके घेण्याकडे वाढलेला कल, शेळी पालनात झालेली घट, प्रजनन कालावधीपूर्वीच बोकड आणि मेंढ्यांची होणारी विक्री, मागणीच्या तुलनेत कमी झालेला पुरवठा, तसेच काही भागात पसरलेली बर्ड फ्लूची साथ अशा विविध कारणांमुळे मटणाचे दर वाढत आहेत. धुळवडीच्या दिवशी तिखट जेवणावळीचा बेत आखलेल्या अनेक मांसाहारींना मटण खरेदीसाठी प्रति किलो ८५० रुपये मोजावे लागले. तसेच मटण खरेदीसाठी मांसाहारींना खाटकांच्या दुकानाबाहेर रांगेत उभे राहावे लागले.
महाराष्ट्रातील अनेक भागात होळीनिमित्त पुरणपोळीचे जेवण केले जाते. तर, दुसऱ्या दिवशी धुळवडीला तिखटाच्या जेवणाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दरवर्षी धुळवडीला मटणाच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांनी धुळवडीनिमित्त सकाळपासून मटणाच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या. गाण्यांच्या तालावर ठेका धरून आणि एकमेकांना रंग लावून दमलेल्या मुंबईकरांनी जेवणात मटणावर ताव मारला. महाराष्ट्रात सोलापूर, सांगोला, उस्मानाबाद, जत आदी विविध दुष्काळी भागात तुलनेने अधिक शेळीपालन केले जाते. मात्र, आता अनेक ठिकाणी सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात येत असल्यामुळे फळ आणि पालेभाज्या पिकवण्याला प्राधान्य दिले जात आहे.
परिणामी, गेल्या काही वर्षांमध्ये शेळीपालन कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, बोकड आणि शेळ्यांची मागणी अधिक असल्यामुळे प्रजनन काळापूर्वीच त्यांची विक्री केली जाते. त्यामुळे त्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. तसेच, आता व्यावसायिक पद्धतीने शेळीपालन करणात येत असले तरीही मागणीनुसार पुरवठा करण्यात व्यावसायिक असमर्थ ठरत आहेत. तसेच, अशा उद्योगांचीही संख्या मर्यादित आहे. मांसाहारींकडून शेळी आणि बोकडाच्या मटणाला मागणी असते. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने बोकडांचे दर सामान्यांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण कोंबडीच्या मांसावर समाधान मानतात. मात्र, वर्षातील निवडक दिवशी मांसाहार करण्याची प्रथा असल्याने एका दिवशी आर्थिक ताण सहन करून बोकडांचे मटण खरेदी केले जाते.
मुंबईत सामान्यतः बोकडाच्या मटणाचे दर प्रतिकिलो ७४० – ७५० रुपये असतात. मात्र, यंदा धुळवडीनिमित्त प्रतिकिलो ८५० रुपये दराने मटणाची विक्री होत होती. असे असतानाही शुक्रवारी सकाळपासूनच मटण खरेदी करण्यासाठी खवय्यांनी खाटकांच्या दुकानांबाहेर गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही अनेकांनी बोकडाचे मटण खरेदी केले. अनेक दुकानांबाहेर शुक्रवारी रात्रीही मटण खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. मटणाचे भाव अधिक असल्याने काही मांसाहारींनी कोंबडीवर ताव मारणे पसंत केले.
बर्ड फ्लूच्या सावटामुळे अनेकांनी कोंबडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी मटणाच्या मागणीत वाढ झाली आहे. मासे खरेदीलाही काही जण प्राधान्य देतात. मात्र होळीनिमित्त बोकडाच्या मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यातच गावरान मटणाला अधिक मागणी असते. -प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे मटण दुकान असोसिएशन, पुणे हिंदु खाटीक समाज