पक्षसंघटना कमकुवत असलेल्या जिल्ह्य़ांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून राज्यसभेसाठी बीडच्या रजनी पाटील यांना संधी दिल्यावर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीकरिता काँग्रेसने ठाणे जिल्ह्य़ातील सय्यद मुझ्झफर हुसेन यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेप्रमाणेच ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
हुसेन दलवाई यांची राज्यसभेवर निवड झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकी करिता काँग्रेसने माजी आमदार मुझ्झफर हुसेन यांचे नाव निश्चित करून अल्पसंख्याक समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घेतली. हुसेन दलवाई यांना अल्पसंख्याक कोटय़ातून आमदारकी मिळाली होती यामुळे ही जागा अल्पसंख्याकांकडेच राहिली पाहिजे, अशी काँग्रेसमध्ये मागणी होती. हुसेन दलवाई यांच्या जागी मुझ्झफर हुसेन यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने कोकण आणि अल्पसंख्याक हा समतोल कायम ठेवला आहे. २००४ ते २०१० या काळात हुसेन हे विधान परिषदेचे सदस्य होते. २०१० मध्ये त्यांनी भिवंडी पश्चिम मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविली होती, पण तेथे त्यांचा पराभव झाला होता. हुसेन यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे नगरसेवकपदही भूषविले आहे. अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत संजय दत्त यांना आमदारकी देण्यात आली. संजय दत्त आणि मुझ्झफर हसेन या दोघांवर ठाणे जिल्ह्य़ात संघटना वाढविण्याची जबाबदारी आली आहे.
बिनविरोध होणार?
गेल्याच महिन्यात राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. त्याच पद्धतीने विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विधान परिषदेसाठी गुप्त मतदान असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरून आमदारांमध्ये नाराजीची भावना आहे. अपक्ष आमदारही अस्वस्थ आहेत. अशा वेळी एखादा तगडा उमेदवार रिंगणात उतरल्यास पोटनिवडणूक चुरशीची होऊ शकते. चंदगडमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याने राष्ट्रवादी उघडपणे विरोधी भूमिका घेणार नाही, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. राष्ट्रवादीची साथ असल्यास विरोधकांनी उमेदवार उभा केला तरी फारसा फरक पडणार नाही.
विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून मुझ्झफर हुसेन!
पक्षसंघटना कमकुवत असलेल्या जिल्ह्य़ांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून राज्यसभेसाठी बीडच्या रजनी पाटील यांना संधी दिल्यावर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीकरिता काँग्रेसने ठाणे जिल्ह्य़ातील सय्यद मुझ्झफर हुसेन यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
First published on: 04-02-2013 at 03:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muzaffar hussain for legislative council from congress