मुंबई : मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांतील निरनिराळ्या खात्यांमध्ये कार्यरत सहाय्यक अभियंत्यांच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी प्रशासनाने पीआयएस यंत्रणेवर आधारित ‘माय बीएमसी सचेत’ ॲप्लिकेशन विकसित केले आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळी होणाऱ्या कामांची माहिती या ॲपमध्ये भरण्याची सूचना अभियंत्यांना करण्यात आली आहे. मात्र, पालिकेच्या या निर्णयाविरोधात अभियंत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाचीही भावना निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांत परिरक्षण व रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, इमारत व कारखाने आदी खात्यांमध्ये कार्यरत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीट ऑफिसर यांनी केलेल्या कामात पारदर्शकता यावी, तसेच कामात दर्जा राखला जावा, या उद्देशाने पीआयएस यंत्रणेवर आधारित ‘माय बीएमसी सचेत’ ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. यात कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन केलेल्या कामाची डिजिटल नोंद, नोंदीचा अभिलेख करणे, तसेच त्या कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. मात्र, ही कार्यप्रणाली राबविण्याचा पालिकेचा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने केला आहे.

हेही वाचा…माहीम खाडीतील मृतदेहाप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

अभियंत्यांना अनेकदा महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे, तसेच त्यांच्या बैठकांना उपस्थित राहावे लागते. तसेच, लोकप्रतिनिधीही विभागातील कामासाठी अभियंत्यांकडे विचारणा करतात. त्यामुळे अन्य दैनंदिन कामे सांभाळूनही प्रत्यक्ष कार्यस्थळी अभियंते कार्यरत असतात. मात्र, या ॲप्लिकेशनमध्ये केवळ अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले आहे, असा आरोप असोसिएशनने केला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे अभियंता संवर्गात नाराजी पसरली असून अविश्वासही निर्माण झाल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अभियंत्यांच्या विविध प्रश्नासंबंधी वेळोवेळी चर्चा झाली. मात्र त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे अभियंत्यांशी चर्चा केल्याशिवाय जीआयएस आधारीत यंत्रणा लागू करू नये, अशी मागणी या संघटनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.याबाबत महानगरपालिकेतील माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक शरद उघडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My bmc sachet app is opposed by mumbai municipal corporation engineers mumbai print news sud 02