कामास नकार देणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता
मुंबई : ऑनलाइन शिक्षणाबरोबरच करोना काळात गरीब घरातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिका शाळेच्या शिक्षकांना आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या मोहिमेचाही भार पेलावा लागणार आहे. या कामाला काही शिक्षकांनी नकार दिल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत पालिकेने शहरातील ४० लाख घरांशी संपर्क करण्याचे ठरवले आहे. या कामासाठी मनुष्यबळ देण्याची जबाबदारी असलेल्या विभाग कार्यालयांनी सक्ती केल्याने पालिकेच्या शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. टाळेबंदीमुळे सध्या पालिकेच्या शाळेतील शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत आहे. परंतु, गरीब घरातील अनेकांकडे मोबाइल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना स्वाध्याय पत्रिका देण्याचेही काम करावे लागते, अशी माहिती शिक्षकांनी दिली.
मुलांना पुस्तके, धान्य वाटप ही कामेदेखील शिक्षकांना करावी लागतात. अनेक शिक्षकांना आधीपासूनच कोविडच्या कामासाठी नियंत्रण कक्षात तसेच विलगीकरण कक्षात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना करोना कर्तव्यावर पाठवले जात नाही. पण, शिक्षकांचे वय न पाहता त्यांना घरोघरी का पाठवले जात आहे, असा सवाल शिक्षकांनी केला. ऑनलाइन शिक्षण सांभाळून या मोहिमेची जबाबदारी पार पाडणे शक्य नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला महत्त्व नाही का, असा सवालही शिक्षकांनी केला आहे.
जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी : म्युनिसिपल समर्थ कामगार संघटना व शिक्षक सभा या दोन संघटनांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. शिक्षकांनीही या कर्तव्यावर हजर होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विभाग कार्यालयांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. अंधेरी पूर्वमध्ये काही शिक्षकांना निलंबित केले आहे. तर अंधेरी पश्चिम आणि परळ, शिवडीचा भाग असलेल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयांनी मोठय़ा संख्येने शिक्षकांना कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम अद्यापही पूर्णपणे सुरू झालेली नाही. याबाबत पालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांच्याशी संपर्क साधला असता, हे आदेश मी दिलेले नाहीत, त्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.