राजकारणात येण्याआधीपासूनच मी समाजकार्यात होते. समाजकारण अधिक प्रभावीपणे करण्याचे एक माध्यम म्हणून मी राजकारणाकडे पाहते. प्रभावी राजकारणी म्हणून वडिलांचा आदर्श समोर असला तरी मला राजकारण्यांपेक्षाही असामान्य कार्य करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांक डूनच जास्त प्रेरणा मिळतात. ‘जाई-जुई विचारमंच’च्या माध्यमातून अनेक समाजसेवकांशी, विविध स्तरांवर काम करणाऱ्यांशी माझा संबंध आला आहे. कुठल्याही सरकारी मदतीविना गडचिरोलीत सामाजिक कार्य उभारणारे डॉ. अभय-राणी बंग, ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेच्या माध्यमातून संशोधन कार्य करणारे युवक अशा प्रत्यक्ष सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांकडून मला समाजकारणासाठी जास्त प्रेरणा मिळते, असे स्पष्ट मत आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले आणि राजकीय वातावरणात वाढलेल्या प्रणितीच्या विचारांची धाव राजकारणापलीकडची आहे हे लक्षात येताच तिला प्रेक्षकांकडून दिलखुलास पसंतीची दाद मिळाली.
‘लोकसत्ता’ आयोजित, ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाऊंज’च्या नव्या पर्वात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सक्रिय असलेल्या तरुण आमदारांच्या फळीतील आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधण्याची संधी वाचकांना मिळाली. ‘लोकसत्ता’चे संदीप आचार्य याणि रोहन टिल्लू यांनी प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधला. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या असलेल्या प्रणिती एक व्यक्ती म्हणून कशा आहेत, एक तरुण आमदार आणि राजकारणी म्हणून असलेले त्यांचे विचार आणि कार्यपद्धती यांच्याविषयी सर्वतोपरी माहिती जाणून घेण्याची एकही संधी प्रेक्षकांनी सोडली नाही. वडिलांच्या परंपरागत सोलापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांचा प्रवास मात्र मुंबई ते सोलापूर असा आहे. त्यामुळे आमदार म्हणून सोलापूरशी जोडले गेलेले नाते, तिथल्या समस्या आणि त्यांच्यावरच्या उपाययोजना, विकासकामे अशा अनेक प्रश्नांना प्रणिती यांनी अत्यंत संयतपणे उत्तरे दिली.
सध्या विधानसभेत असलेले सर्वपक्षीय तरुण आमदार विकासाची कास धरणारे आहेत. त्यासाठी आम्ही एकत्र येत प्रसंगी संबंधित मंत्र्यांना निर्णय घेण्यास भाग पाडत असतो. त्याचप्रमाणे विविध प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत एखादा मंच वगैरे स्थापन करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले. आपल्या वडिलांकडून आपण अनेक चांगले गुण घेतले असले, तरीही सर्वाशी चांगले वागण्याच्या नादात अनेकदा त्यांची फसवणूक होते. वडिलांचा हा दोष आपण आपल्या राजकीय वाटचालीत टाळणार आहोत, असेही प्रणिती यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. आमदार म्हणून काम करीत असताना सोलापूरमध्ये सुरू असलेल्या विकासकामांपासून ते नक्षलवाद, महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यासंबंधीचे कायदे, निवडणुकीच्या वेळी होणारी पक्षीय बंडखोरी, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी आणि मतदारसंघात काम करताना येणारे अनुभव अशा अनेक विषयांवर प्रणिती यांनी थेट आणि मनमोकळी मते मांडली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा