कर्करोग झाल्यावर आयुष्य अंध:कारमय झाले होते. यातून जगले, तर माझे सर्वस्व असलेली चित्रकला आणि उर्वरित आयुष्य कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठीच खर्च करीन, असा मनोमन संकल्प केला. त्या बळावर आजारातून पूर्णपणे मुक्त झाल्यावर आता डोंबिवलीच्या ज्येष्ठ चित्रकला शिक्षिका आणि चित्रकार कुमुद डोके यांनी त्यासाठी पावले टाकून रुग्णांच्या मदतीला सुरुवातही केली आहे. माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य घेऊन हे काम अधिकाधिक व्यापक करण्याचेही प्रयत्न सुरू  आहेत.
स्वामी विवेकानंद शाळेतील श्रीमती डोके या जुन्या कलाशिक्षिका. गेली ३५-४० वर्षे कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीमती डोके यांना गेल्या वर्षी गर्भाशयाचा कर्करोग झाला. त्यावर उपचारासाठी ठाण्यामधील देठणी या ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयुष्य पुढे आहे की नाही, माहीत नव्हते. चेहऱ्यावर दु:ख घेऊन आणि निराश मन:स्थितीत कोणापुढे जायचे नाही. केवळ आनंदी चेहऱ्यानेच सर्वासमोर जायचे, या विचाराने एकांतवासच पत्करला, असे मनोगत व्यक्त करीत श्रीमती डोके म्हणाल्या, आपल्या आजाराचा संसर्ग व त्रास इतरांना होऊ नये, ही इच्छा असल्याने कोणालाही फारसे भेटतही नव्हते. शस्त्रक्रिया, रेडिएशन व अन्य उपचार सुरू होते. त्यांना सामोरे जाताना रुग्णालयात दाखल होत असलेल्या अनेक गरीब रुग्णांचे हाल मी पाहात होते. त्यामुळे या दुखण्यातून वाचले तर कर्करोगग्रस्तांसाठी मदत करायची, असे ठरविले.
या दुखण्यातून बाहेर पडल्यावर  डोके यांनी आपल्या चित्रांची कॅलेंडर्स आणि शुभेच्छापत्रे तयार केली. ती माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने विकून काही रक्कम जमा केली. त्यातून कर्करोगाच्या दोन गरीब रुग्णांच्या मदतीसाठी काही रक्कम एका धर्मादाय संस्थेच्या सुपूर्द केली. श्रीमती डोके यांच्या चित्रांची प्रदर्शने वरळीचे नेहरू सेंटर व अन्यत्र झाली असून २१ एप्रिलपासून जहांगीर कलादालनातही प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जो निधी उभा राहील, त्याचा वापर कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी करण्याचे मी ठरविले असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकर यांची प्रेरणा
सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम लगेचच एखाद्या संस्थेला देण्याचे जाहीर करतात. त्यातून प्रेरणा घेऊन आता माझी चित्रकला कर्करोगग्रस्तांसाठी वापरणार असल्याचे श्रीमती डोके यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My painting art to exist for cancer patients