१४ दिवसांची तान्ही मुलगी पाळण्यातच मृतावस्थेत आढळल्याने गूढ निर्माण झाले असून विक्रोळीतील टागोर नगरच्या वीर भवानी चाळीत ही घटना उघडकीस आली. गळा आवळून तिची हत्या झाल्याच्या निष्कर्षांनंतर तिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद गोरक्ष (३१) हे पत्नी काजोल (२१) आई रेखा आणि दोन लहान भावासह राहतात. १५ दिवसांपूर्वी काजोलने पूजाला जन्म दिला. काजोल तान्ह्या पूजाला साडीच्या पाळण्यात ठेवत असे. सोमवारी रात्री  मुलीला झोपविल्यानंतर  पहाटे तीनच्या सुमारास काजोल दचकून उठली. त्यावेळी तिने पाळण्यात पाहिले असता काजोल निपचित पडली होती. तिला त्वरीत राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पूजाच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या. सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. परंतु अधिक तपासानंतर मंगळवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची  माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महिपत इंदलकर यांनी दिली.
मोलकरणीकडून दागिन्यांची लूट
घरात कुणी नसल्याचा फायदा उचलत तेथील साडेआठ लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला मुलुंड पोलिसांनी अटक केली. सोमवारी ही घटना घडली होती. आनंद कृष्णा (४०) हे मुलुंड पश्चिमेच्या सवरेदय नगर सोसायटीतील अभिनंदन सोसायटीत राहतात. सोमवारी त्यांच्या घरातील साडेआठ लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. त्यांच्या घरात गीता महाकाली (३६) ही गेल्या काही वर्षांपासून काम करत होती. जवळच्याच विजयनगर झोपडपट्टीत ती राहाते. मंगळवारी  पोलिसांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने चोरीची कबुली दिली.

Story img Loader