मुंबई : गेल्या आठवड्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाने काढलेल्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासातील ३०५ घरांच्या सोडतीवर रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. ही सोडत आपल्याला मान्य नसून या सोडतीत भेदभाव झाला आहे. यापूर्वीच्या सोडतीमधील रहिवाशांना सर्वच इमारतींमधील वरच्या मजल्यावरील घरे देण्यात आली असून नंतर काढण्यात आलेल्या रहिवशांना खालच्या मजल्यावरील घरे देण्यात आली आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाने हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप करीत रहिवाशांनी आता सर्वच १२५० घरांसाठी नव्याने सोडत काढण्याची मागणी केली असून रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक ७, ८, ९ आणि १० मधील ३०५ रहिवाशांना पुनर्वसित इमारतीतील घराची हमी देण्यासाठी मुंबई मंडळाने सोडत काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० मे रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळींतील रहिवाशांच्या घरांच्या सोडतीत भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांकडून होवू लागला आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीत सर्वच इमारतींमधील वरच्या मजल्यांवरील घरे संबंधित रहिवाशांना देण्यात आली आहेत. त्यानंतर काढलेल्या सोडतीत रहिवाशांना सर्वच इमारतींमधील खालील घरे देण्यात आली आहे. म्हाडा भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत रहिवाशांनी २९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ३ जुलै रोजी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. मात्र यादरम्यान न्यायालयाने म्हाडाला सोडत काढण्याची मुभा दिली होती. त्यानुसार मंडळाने १० मे रोजी सोडत काढण्याची तयारी केली. पण या दिवशी एकही रहिवाशी सोडतीला न आल्याने मंडळाला सोडत रद्द करावी लागली. तर १४ मे रोजी मंडळाने ही सोडत काढून ३०५ रहिवाशांना घराची हमी दिली. पण आता मात्र या सोडतीला असलेला विरोध रहिवाशांनी तीव्र केला आहे.
हेही वाचा – म्हाडाचा फुटकळ भूखंडही महाग होणार? महसूल वाढविण्यासाठी प्राधिकरणाचे प्रयत्न
हेही वाचा – निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, आयएमए आक्रमक, राष्ट्रीय स्तरावर राबविणार मोहीम
मंडळाकडून काढण्यात आलेली सोडत आपल्याला मान्य नसल्याची माहिती मंगेश राणे यांनी दिली. या सोडतीत भेदभाव करण्यात आला असून आधीच्या ९०० रहिवाशांना सर्वच इमारतींच्या वरच्या मजल्यांवर घरे देण्यात आली आहेत. तर आम्हाला खालील मजल्यावर घरे देण्यात आली आहेत. त्यामुळे हा आमच्यावर अन्याय आहे. ही सोडत रद्द करावी आणि सर्वच १२५० घरांसाठी नव्याने सोडत काढावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. तर हीच मागणी याचिकेद्वारे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.