लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत सात इमारतींचे सात मजल्यांपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगात पूर्ण करून मार्च २०२६ पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन गुरुवारी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिले. त्याचवेळी दिवाळीनंतर दुसऱ्या टप्प्यातील १,२०० घरांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

वरळी, ना. म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या तिन्ही चाळींतील पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरू आहे. वरळीतील पुनर्वसित इमारतीतील ५५० घरांचा ताबा येत्या काही महिन्यात देण्याचे मंडळाचे नियोजन आहे. ना. म. जोशी मार्ग चाळीतील पुनर्वसित इमारतींच्या कामाला सर्वात आधी सुरुवात झाली होती. येथील रहिवाशांची पात्रता निश्चित करून पात्र रहिवाशांना सर्वात आधी संक्रमण शिबिरात स्थलांतरित करून त्यांच्या इमारती रिकाम्या करून घेण्यात आल्या होत्या. याच चाळींतील पात्र रहिवाशांना सर्वात आधी पुनर्वसित इमारतीतील घराची हमी देण्यासाठी सोडत काढण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि प्रकल्पास होणारा विरोध यामुळे पुनर्वसित इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला विलंब झाला. सात पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला २०२३ मध्ये सुरुवात झाली. पण आता मात्र पुनर्वसित इमारतींच्या कामाने वेग घेतला आहे.

आणखी वाचा-एक लाखाहून अधिक अर्जदार पात्र, म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध

ना. म.जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी प्रकल्पस्थळी एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आणि रहिवाशी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या प्रगतीची माहिती रहिवाशांना दिली. त्यानुसार २२ मजली सात इमारतींचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत सात मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम वेगात पूर्ण करून मार्च २०२६ पासून पात्र रहिवाशांना १,२६० घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यानी दिल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी दिली.

आणखी वाचा-पात्र झोपडीधारकाकडून खरेदी केलेल्यांना दिलासा; राज्य सरकारची अभय योजना

वाहनतळासाठी आग्रह

दुसऱ्या टप्प्यातील १,२०० घरांच्या कामाला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन असल्याचे नलगे यांनी सांगितले. कामाच्या या प्रगतीबाबत रहिवासी समाधानी आहेत. मात्र रहिवाशांच्या मागण्यांची पूर्तता व्हायला हवी, अशी भूमिका यावेळी रहिवाशांनी घेतली. वरळीतील पुनर्वसित इमारत प्रकल्पाप्रमाणे ना. म. जोशी मार्ग प्रकल्पातील रहिवाशांनाही स्वतंत्र, एका घरामागे एक वाहनतळाची जागा द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा रहिवाशांनी केली. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकारी राज्य सरकारला आहेत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.