पुण्याहून शिर्डीला नियोजित पतीसह निघालेल्या तरुणीचे अपहरण करून वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी तरुणीलाच पट्टय़ाने मारहाण करणारे व अपशब्द वापरणारे अहमदनगरचे अतिरिक्त अधीक्षक संजय बारकुंड आणि निरीक्षक तांबे यांना निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी विधानपरिषदेत केली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. हे प्रकरण अतिशय गंभीर असून तरूणीला पळवून वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. पोलिसांनी तक्रार न नोंदविता अधीक्षकांकडे पाठविले. पुण्यात गुन्हा नोंदविल्यावर शिरपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पाटील यांनी तासाभरात संबंधित तरुणीला हजर केले. वेश्याव्यवसायाच्या रॅकेटची त्यांना पूर्ण कल्पना व माहिती आहे. त्यांनाही निलंबित करून चौकशी करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.  
नगरच्या तोफखाना पोलिसांनी गुन्हा न नोंदविता तक्रारदारांना अधीक्षकांकडे पाठविले. याची काहीही गरज नव्हती. पोलिसांनी शून्य पध्दतीनुसार गुन्हा नोंदवून संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित होते. अतिरिक्त अधीक्षक बारकुंड यांनी दिलासा देण्याऐवजी या तरुणीलाच मारहाण करून अपशब्द वापरले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

Story img Loader