नागपाडय़ाच्या नयानगर येथून बेपत्ता झालेल्या तीन मुलांसारखी दिसणारी तीनही मुले मुंबई सेंट्रल परिसरात दिसून आल्याने बेपत्ता प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान, बुधवारी ही मुले कुल्र्यात असल्याचा एक निनावी दूरध्वनी आल्याने नागपाडा पोलिसांनी कुर्ला परिसरात धाव घेत पूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र त्यात यश मिळाले नाही. गरीब कुटुंबाची आलेली ही मुले बेपत्ता झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांच्या दु:खाला पारावार राहिलेला नाही.
रविवारी सायंकाळी नागपाडय़ातून कल्सुम मोहम्मद झुबेर खान (६) हिच्यासह तरन्नुम गुलाम रसूल शेख (६) आणि गुलफाम ऊर्फ लड्डन हे बहीणभाऊ एकाएकी बेपत्ता झाले. नागपाडा पोलिसांनी या मुलांना शोधण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली असून अहोरात्र या मुलांचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई सेंट्रलजवळच्या रस्त्यावरील एका सीसीटीव्ही चित्रीकरणात तीन मुले चालताना आढळून आल्याचे पोलिसांना कळले. पोलीस या चित्रीकरणाची तपासणी करीत असून ही मुले नेमकी तीच आहेत का, हे पडताळून पाहत आहेत. दरम्यान, बुधवारी पोलिसांना या तीन मुलांसारखी दिसणारी मुले कुर्ला परिसरात असल्याचा निनावी दूरध्वनी आला. पोलिसांच्या पथकाने कुल्र्यात धाव घेत संपूर्ण परिसर पिंजून काढला परंतु मुले काही सापडली नाहीत. दरम्यान, रविवारी खेळण्यासाठी बाहेर आलेली ही मुले चालत जाताना त्यांच्या हातात एक खोका दिसत असून तो चॉकलेट अथवा मिठाईचा आहे की अन्य कुठला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. चॉकलेट-मिठाईचे आमिष दाखवून या मुलांना बोलावून त्यांना पळविण्याची शक्यताही पुढे येत आहे. नागपाडा पोलिसांनी मुलांचे फोटो जाहीर करीत कोणालाही मुलांविषयी माहिती मिळाली असता, पोलिसांना कळवावे, असे आवाहनही केले आहे. दरम्यान, या मुलांच्या पालकांची अवस्था दिवसागणिक बिकट होत चालली आहे. गरीब असलेले कुटुंबीय आपले कोणाशीही वैर नसताना कोणी आमच्या मुलांना का पळवून नेले, असा प्रश्न करीत आहेत. कुठून तरी मुले घरी येतील किंवा पोलीस त्यांना घेऊन येतील, या आशेवरच दिवस-रात्र कुटुंबीय जगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा