मुंबईः नागपाडा परिसरात बेकायदा मांसाची वाहतूक केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या टेम्पोत २०० किलो मांस सापडले असून ते गोमांस असल्याचा आरोप आहे. चाचणीनंतर ते स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यासमोर काही कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहेत.
सर जे.जे. मार्ग उड्डाणपूलाच्या उत्तरवाहिनीवरून येणारा टेम्पो अडवण्यात आला. या टेम्पोमध्ये २०० किलो मांस सापडले आहे. त्यामुळे अवैध्यरित्या मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३२५ व मोटर वाहन कायदा कलम ६६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पीरखान स्ट्रीट कॉर्नर येथे टेम्पो अडवण्यात आला होता. याप्रकरणी टेम्पो चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागपाडा पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेम्पो अडवला तो परिसर नागपाडा पोलिसांच्या हद्दीत येत होता. पण कार्यकर्त्यांनी सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार केली. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे तेथे जमाव गोळा झाला.
या प्रकरणी सर जे.जे. पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतरांची व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात घातल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५० ते ६० अनोळखी व्यक्तींविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या भेटीसाठी जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यकर्ते आले होते. पण जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्यामुळे त्यांनी भेट झाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी व हनुमान चालिकाचे पठण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे तेथे गर्दी झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्वांची समजूत काढून त्यांना तेथून जाण्यास सांगितले.
मांसाची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणत्याही अफवेवर कोणीही विश्वास ठेऊ नये. कायदेशिर कारवाई केली जात आहे. येथे पूर्णपणे शांती असून पोलीस तैनात आहेत, अशी माहिती उपायुक्त(परिमंडळ-१) डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडून देण्यात आली. कोणाला काही तक्रार असेल, त्याने जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार करावी, असेही यावेळी मुंढे यांनी सांगितले.