नागपूर कारागृहातून मोका लागलेले पाच आरोपी पलायन करतात, तडीपार गुंड एका युवतीला मारहाण करतात यावरूनच राज्यातीलच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या गावातीलही कायदा-सुरक्षा व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था चांगली असल्याचा मुख्यमंत्र्याचा दावा पोकळ असल्याचा आरोप, विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केला. १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी याकुब मेमन, कुख्यात डॉन अरुण गवळी, पुणे बॉम्बस्फोटाचा आरोपी हिमायत बेग यासारखे अनेक आरोपी नागपूरच्या कारागृहात आहेत. इतक्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेतही ते पाच आरोपी पळून जातात. यातून नागपूर हे ‘क्राईम कॅपिटल’ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आल्याचे मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीबाबात निवेदन करण्याचेही आदेश सभापतींनी दिले आहेत.

Story img Loader