मुंबई : दोन वर्षांच्या खंडानंतर नागपूरमध्ये सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व अन्य भाजप नेत्यांची महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने, राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी, सीमाप्रश्न, उद्योग गुजरातमध्ये जाणे आदी विषय अधिक गाजणार आहेत. यामुळेच हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची परंपरा यंदाही कायम राहील, अशी चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावणे, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम, पक्षातील फूट, स्वपक्षाच्या आमदारांच्या रोषामुळे चप्पल घेऊन पळण्याची मुख्यमंत्र्यांवर आलेली नामुष्की हे सारे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातच घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री बदलल्याची उदाहरणे आहेत. यामुळेच नागपूरचे हिवाळी अधिवेशन नेहमीच मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरते. यंदाही विविध मुद्दय़ांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची योजना आहे. विरोधकांनी ताणून धरल्यास हिवाळी अधिवेशनात कामकाजाऐवजी गोंधळच अधिक होण्याची चिन्हे आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडीने लक्ष्य केले आहे. अधिवेशनाच्या तोंडावर मुंबईत काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चातही कोश्यारी यांच्यावर यथेच्छ टीका करण्यात आली. तसेच त्यांची हकालपट्टी न झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देण्यात आला. विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये कोश्यारी यांना लक्ष्य केले जाईल. तसेच त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी गोंधळ घातला जाईल, असे सांगण्यात आले. यामुळे सुरुवातीचे तीन ते चार दिवस अधिवेशनात गोंधळ होण्याची चिन्हे आहेत.

या मुद्यांवरून सरकारची कोंडी?

* महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरूनही भाजपची कोंडी करण्याची विरोधकांची योजना आहे. तसेच सीमाभागातील जनतेच्या महाराष्ट्र ठाम पाठीशी उभे आहे, असा ठरावही उभय सभागृहांमध्ये करण्यात येणार आहे.

* ‘वेदान्त – फॉक्सकॉन’, ’टाटा – एअरबस‘ हे गुजरातमध्ये गेलेले प्रकल्प, रायगडमधील औषधनिर्मितीचा राज्याबाहेर गेलेला प्रकल्प यावरून शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी करण्याची योजना आहे.

* विदर्भाचा अनुशेष, धान, संत्री, कापूस उत्पादकांना मदत मिळण्यात होणारा विलंब आदी विदर्भाशी संबंधित प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे.

* दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याचे कसे नुकसान झाले याचा पाढा वाचण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. काही राजकीय चमत्कार होऊ शकतात, असे संकेतही सत्ताधाऱ्यांकडून दिले जात आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur winter session set to be stormy over governor s comments on chhatrapati shivaji boundary dispute zws
Show comments