यंदाचा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार विदर्भातील ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत आणि ‘फॅन्ड्री’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार, २० सप्टेंबर रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमीमधील मिनी थिएटर येथे सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. यंदाचा हा १८वा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी रुपये पाच हजार रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने ‘दलित वास्तवाचे माध्यमांतर’ या विषयावर चर्चासत्र होणार असून या चर्चासत्रामध्ये कवी लोकनाथ व दिग्दर्शक नागराज यांच्यासह ‘आयदान’च्या लेखिका ऊर्मिला पवार, शाहीर संभाजी भगत, पत्रकार युवराज मोहिते सहभागी होतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड भूषविणार आहेत. दलित-विद्रोही साहित्यापासून चित्रपट-नाटक माध्यमापर्यंत दलित वास्तवाचा, जाणिवेचा झालेल्या प्रवासाचा मागोवा या चर्चासत्रातून घेण्यात येणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी दिली.