मुंबई : दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड ॲकॅडमी’तर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय’ या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच, आशियाई देशांमध्ये दंत वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२५ वर्षासाठी डॉ. नीलम अंद्राडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्रीलंकेतील कोलंबो येथे पिएरी फॉचर्ड ॲकॅडमीतर्फे दंत आरोग्याशी संबंधित विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणारे रुग्णालय म्हणून नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच, आशियाई देशांमध्ये दंत वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२५ साठी डॉ. नीलम अंद्राडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक दंतशास्त्राचे जनक मानले जाणारे फ्रेंच दंतचिकित्सक पिएरी फॉचर्ड यांच्या स्मरणार्थ व विविध क्षेत्रांतील योगदानासाठी या ॲकॅडमीच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात.

पिएरी फॉचर्ड ॲकॅडमीसारख्या नावाजलेल्या संस्थेतर्फे झालेल्या सन्मानामुळे रुग्णांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याची नायर रुग्णालयाची जबाबदारी वाढली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवाव्यात, यासाठी अधिक कटिबद्धपणे कार्य करण्यासाठी निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास यानिमित्ताने मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी व्यक्त केला.

वर्षाला साडेतीन लाख रुग्णांवर उपचार

मुंबई महानगरपालिका संचालित व मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय दंत महाविद्यालय हे देशातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयाची स्थापना १९३३ मध्ये झाली. सध्या येथे एकूण २५ रुग्णशय्या व ३०० दंत उपचार खुर्ची उपलब्ध आहेत. दररोज सरासरी १,००० ते १,२०० रुग्ण, तर वार्षिक सरासरी साडेतीन लाख रुग्ण दंत उपचारासाठी येथे येतात. नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या वतीने केवळ रुग्णसेवेपुरते मर्यादित न राहता अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

रुग्णांसाठी समर्पण भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान या जीवनगौरव पुरस्काराने झाला. नायर दंत महाविद्यालयामध्ये घेतलेले शिक्षण आणि त्यानंतर बजावलेली सेवा, तसेच प्रशासनाकडून मिळालेल्या पाठबळामुळे व्यावसायिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय सेवेमध्ये सन्मान प्राप्त करू शकले. मुंबई महानगरपालिकेत ४६ वर्षांपासून रुग्णसेवेचे भाग्य मिळाले, हे माझ्यासाठी गौरवाचे आहे. – डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय