रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला अद्ययावत सुविधा मिळाव्यात. त्यांच्यावर जलद गतीने उपचार व्हावेत यासाठी नायर दंत रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असून ती महिनाभरातच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. डिजिटल दंत प्रयोगशाळा, अद्ययावत उपकरणांसह सुसज्ज विभाग, अत्याधुनिक सिम्युलेटर दंत प्रयोगशाळा, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नवे वर्ग, वसतिगृह, उपहारगृह आदी सुविधांनी ही इमारत सुसज्ज असणार आहे.

हेही वाचा >>>पदवीधर, शिक्षकच्या पाच मतदारसंघांत ३० जानेवारीला निवडणूक; भाजप, महाविकास आघाडीत लढत

नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दररोज उपचारासाठी हजारो रुग्ण येत असतात. या रुग्णांना उत्तम व जलद गतीने मोफत किंवा रास्त दरात उपचार मिळावेत यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. या इमारतीचे काम पूर्ण झाले असून ती महिनाभरामध्ये सुरू करण्यात येणार आहे. देशात प्रथमच उभारण्यात आलेली डिजिटल दंत प्रयोगशाळेचा या इमारतीत समावेश आहे. यामुळे कृत्रिम दात किंवा दाढ बसवण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या दातांचे माप घेणे, त्याचा साचा बनविणे, दाताखाली पट्टी बसविणे, दात बसविणे, अशा अनेक प्रक्रिया पार पाडण्यासाठी रुग्णाला साधारणपणे सहा ते सात वेळा डॉक्टरकडे यावे लागते. मात्र आता हा त्रास कमी होणार आहे. ही प्रयोगशाळा पूर्णतः संगणिकृत असणार आहे. नवीन दात, दाढ बसवणे किंवा कवळी बसवण्याची प्रक्रिया अवघ्या दोन – तीन दिवसांत पूर्ण होईल. नायर दंत रुग्णालयामध्ये आतापर्यंत पारंपरिक पद्धतीच्या प्रतिकृतीवर विद्यार्थ्यांना सराव करून प्रशिक्षण घ्यावे लागत होते. मात्र विद्यार्थ्यांना अद्ययावत व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रशिक्षण मिळावे यासाठी या नव्या इमारतीमध्ये सिम्युलेटर दंत प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्णत: अद्ययावत, इलेक्ट्रॉनिक खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रॉनिक खुर्चीमध्ये दंत उपचारासाठी लागणारे सर्व साहित्य अद्ययावत व आधुनिक असणार आहे. त्याचप्रमाणे या इमारतीमध्ये प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र विभाग, पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नवे वर्ग, उपहारगृह अशा सुविधा असणार आहेत. या इमारतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे ही इमारत महिनाभरात सुरू करण्यात येईल, अशी माहिती नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

हेही वाचा >>>सलग सुट्टय़ांमध्ये पर्यटकांची नैसर्गिक अधिवासात वर्दळ; संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राणी बागेतील पशुपक्ष्यांना पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटकांची भेटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयातच होणार वसतिगृह
नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रुग्णालयात वसतिगृह नाही. त्यामुळे त्यांना करी रोड येथील वसतिगृहात जावे लागते. हे वसतिगृह लांब असल्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन नवीन इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतिगृह उभारण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांना रुग्णालयात अधिक वेळ सराव करण्यास मिळेल, असेही डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.