मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मागण्या आणि अडचणींबाबत म्युनिसिपल मजदूर युनियनने उपोषण करण्याबाबत प्रशासनाला नोटीस दिली होती. या नोटीसची दखल घेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन नायर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे मॅडम यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. अन्य विभागात काम करणाऱ्या सात कामगारांना रुग्ण सेवेसाठी वैद्यकीय विभागात घ्यावे.
कंत्राटदारामार्फत चतुर्थश्रेणी कामगारांच्या रिक्त पदांवर घेतलेल्या १२ बहुउद्देशीय कामगारांना चतुर्थश्रेणी कामगारांच्या रिक्त पदांवर व अनुपस्थितीच्या वेळी काम द्यावे, महिला स्वच्छतागृह, तसेच परिचारीका कक्षाच्या सफाईसाठी महिला कामगाराची नियुक्ती करावी, चतुर्थश्रेणी कामगारांना त्यांच्या पदाचे काम द्यावे, लाड पागे समितीच्या धोरणाप्रमाणे सफाई कामगारांना सर्व सेवा सवलती व फायदे द्यावे आदी मागण्यांचे निवेदन म्युनिसिपल मजदूर युनियनने डॉ. नीलम अंद्राडे आणि मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेत डॉ. नीलम अंद्राडे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी जाहीर केले.