मुंबई : रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना समाजामध्ये देव मानले जाते. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांनी नैतिकता सांभाळून अविरतपणे रुग्णसेवा करावी, असा सल्ला नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी नायर रुग्णालयातील डॉक्टरांना डॉक्टर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला.नायर रुग्णालयामध्ये ‘राष्ट्रीय डॉक्टर दिवस’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. भारतामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे. रुग्ण सेवेमध्ये डॉक्टरांची भूमिका फार महत्त्वाची आहे. समाजाच्या विकासामध्ये डॉक्टरांचे योगदान मोठे आहे, असे मत डॉ. मेढेकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>> मुंबई: उड्डाणपुलावरून २० फूट खाली कोसळून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
रुग्ण सेवेमध्ये अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक पातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे, असे नायर रुग्णालयातील वैद्यकीय समाज सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली परांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले.
नायर रुग्णालयात अविरतपणे रुग्ण सेवा करणाऱ्या सर्व विभाग प्रमुखांना यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. धारप, उप अधिष्ठाता डॉ. सारिका चापने, रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या अध्यक्ष रजनी बरासिया आणि रुग्णालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. आभार प्रदर्शनात डॉ. अंजली परांड यांनी नायर रुग्णालयातील सर्व विभागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांच्या रुग्ण सेवेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमात रुग्णांनी एक नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज विकास अधिकारी स्मिता मंडपमाळवी यांनी केले.