मुंबई : सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड अकॅडमी’ च्या माध्यमातून दिला जाणारा अत्यंत मानाचा असा पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला आहे. ‘आशिया पॅसिफिक प्रदेशात सर्वोत्तम सामाजिक सेवा’ या श्रेणीतील हा पुरस्कार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी दिल्ली येथे पार पडलेल्या सोहळ्यात पिएरी फॉचर्ड अकॅडमीच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेरील बिलिंगस्ले यांच्या हस्ते, नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. पिएरी फॉचर्ड अकॅडमीची स्थापना सन १९३६ मध्ये झाली. आधुनिक दंतशास्त्राचे जनक मानले जाणारे फ्रेंच दंतचिकित्सक पिएरी फॉचर्ड यांच्या स्मरणार्थ आणि विविध क्षेत्रातील योगदानासाठी या अकॅडमीच्या वतीने पुरस्कार दिले जातात.

हेही वाचा…सशक्तदेखील स्वत:ला ‘बळी’ म्हणवतात, ही आजची समस्या!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार तसेच गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पिएर फॉचर्ड अकॅडमीने दिलेल्या मानाच्या पुरस्कारामुळे येत्या काळात आणखी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांना सेवा देण्यासाठीची नायर रूग्णालय दंत महाविद्यालयालाची जबाबदार वाढली आहे, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित आणि मुंबई सेंट्रल स्थित नायर रुग्णालय दंत महाविद्यालय हे सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी दुसर्‍या क्रमांकाचे रूग्णालय आहे. या रूग्णालयाची स्थापना १९३३ मध्ये झाली होती. रूग्णालयात दरदिव‌शी सरासरी १ हजार ते १२०० रूग्ण मौखिक आरोग्याशी संबंधित उपचारासाठी येतात. तर वार्षिक सरासरी साडेतीन लाख रुग्ण दंत उपचारासाठी येतात. नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या वतीने रूग्ण सेवेच्या पलीकडे जाऊन मोठ्या संख्येने सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात.

हेही वाचा…लाखो बहिणी नावडत्या; ‘लाडकी बहीण’ योजनेच्या सर्व अर्जांची छाननी,वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरेंची घोषणा

या रूग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य सामाजिक विभागाच्या वतीने विविध ठिकाणी ‘पोर्टेबल डेन्टल व्हॕन ऑन व्हील’ संकल्पनेवर आधारित शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये विविध दवाखाने, वृद्धाश्रम, तुरूंग, दृष्टी नसणारे विद्यार्थी, अनाथ आणि निराधार मुले, देहविक्रय करणाऱ्यांच्या वस्तीतील मुलांच्या शाळा तसेच रोटरी क्लब याठिकाणी दंत शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

शिबिराच्या ठिकाणी प्रामुख्याने मौखिक आरोग्यासाठी जनजागृती करण्याकरिता दंत महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येतात. अशा सर्व उपक्रमांची दखल घेत पिएरी फॉचर्ड अकॅडमीने नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाच्या सामाजिक योगदानाचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nair hospital dental college received prestigious pierre fauchard academy award for societal contribution mumbai print news sud 02