मुंबई : नायर रुग्णालयातील ईएनटी विभागामध्ये कानाच्या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. मात्र काही कारणास्तव ऐकू येत नसलेल्या ४४ मुलांना नायर रुग्णालयामुळे श्रवण क्षमता परत मिळाली आहे. याबद्दल ४४ मुले व त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला.
नायर रुग्णालयाच्या ईएनटी विभागामध्ये ऐकू येत नसल्याची समस्या घेऊन अनेक रुग्ण असतात. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. काही मुलांना जन्मत:च ऐकू येत नाही. अशा काही मुलांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात येते, तर काही मुलांना श्रवण यंत्र उपलब्ध करून देण्यात येते. नायर रुग्णालयाने नुकतेच ४४ मुलांना त्यांची श्रवण क्षमता परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. या ४४ पैकी काही मुलांना ऐकण्याच्या दुर्बलतेमुळे बोलता येत नव्हते, मुलांची तपासणी करून त्यांची कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली. तर काही मुलांना श्रवण यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे या मुलांना ऐकण्याची शक्ती पुन्हा मिळाली.
हेही वाचा >>> राज्याचा अर्थसंकल्प : ‘लाल परी’ची झोळी रितीच, जुन्या योजनांची पुन्हा घोषणा
यामुळे ही मुले आणि त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. श्रवणशक्ती मिळाल्यामुळे ही मुले आता गाणी ऐकण्याबरोबरच मोठ्या आनंदाने गाणी गाऊ लागली आहेत. श्लोक पाठ करत आहेत, आत्मविश्वासाने स्वत:बद्दल बोलू लागले आहेत. बहुतेक सर्व मुले शाळेत जात आहेत. कॉक्लिअर इम्प्लांट केलेल्या मुलांना इम्प्लांटची काळजी आणि देखभाल कशी करायची याची माहिती तसेच या तंत्रज्ञानातील प्रगतीबद्दल कॉक्लिअर कंपनीच्या प्रतिनिधींकडून मुलांना सविस्तर माहितीही देण्यात आली. ईएनटी विभागाच्या प्रमुख डॉ. बच्ची हाथीराम आणि डॉ. विक्की खट्टर आणि समाजसेवा विभागाच्या अधिकारी यांनी या मुलांना मार्गदर्शन केले.
ऐकण्याच्या दुर्बलतेमुळे बोलता येत नसलेल्या मुलांवर योग्य उपचार करून त्यांची श्रवण क्षमता पूर्ववत करण्यामध्ये नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांचे प्रयत्न कायम सुरू असतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होत आहे.