लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: जन्मत: अपंग बनविण्याऱ्या स्पायनल मस्कूलर ॲट्रोफी या आजाराने त्रस्त बालकांवर आता नायर रुग्णालयात अद्ययावत आणि मोफत उपचार करण्यात येत आहेत. स्पायनल मस्कूलर ॲट्रोफी या आजारावरील उपचारासाठी नायर रुग्णालयामध्ये बहुविद्याशाखीय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून हा विभाग सुरू करणारे नायर रुग्णालय राज्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे.

स्पायनल मस्कूलर ॲट्रोफी आजारामध्ये रुग्णाच्या पाठीचा कणा व त्याच्या स्नायूंची हळूहळू झीज होऊन ते नष्ट होतात. हा आजार अनुवांशिक असून, तो १० हजारामध्ये एका बालकाला होतो. यावरील उपचार प्रचंड खर्चिक असून, औषधे परदेशातून मागवावी लागतात. या आजारासाठी बाळाला दर तीन ते चार महिन्यांनी औषधाची एक मात्रा द्यावी लागते. त्यासाठी किमान ३० ते ४० हजार रुपये लागतात. अनेक पालकांना हे उपचार परवडत नाहीत. मात्र नायर रुग्णालयामध्ये हा आजार असलेल्या बाळांवर उपचारासाठी १४ जुलै २०२३ पासून बहुविद्याशाखीय बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. या केंद्रांमध्ये बालकांना सर्व उपचार व महागडी औषधे मोफत मिळणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली.

आणखी वाचा-“माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस…” मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरची शेवटची पोस्ट चर्चेत

काय आहेत लक्षणे

हा आजार झालेल्या बाळांना जन्मतःच श्वास घेण्यास त्रास होतो. त्यांना हात पाय हलवता येत नाहीत. तसेच मानही सावरता येत नाही. ही लक्षणे पटकन लक्षात येत नसल्याने अनेक बालकांना वेळेत उपचार मिळत नाहीत.

तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार

करोनाकाळात नायर रुग्णालामध्ये स्पायनल मस्कूलर ॲट्रोफी या आजारावरील प्राथमिक उपचारास सुरुवात करण्यात आली. बालकांना उपचारासाठी १५ दिवसांतून एकदा बोलवण्यात येत होते. या बालकांना अनेक समस्या असल्याने नव्याने सुरू केलेल्या बहुविद्याशाखीय बाह्यरुग्ण विभागामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुरभी राठी यांनी दिली.

आणखी वाचा-मुंबई: गिरणी कामगार गुरुवारी आझाद मैदानावर धडकणार

उपचारासाठी ५५ रुग्णांनी नोंद

स्पायनल मस्कूलर ॲट्रोफी आजाराने त्रस्त असलेल्या ५५ बालकांची उपचारासाठी नायर रुग्णालयामध्ये नोंद झाली आहे. करोनाकाळापासून येणाऱ्या बालकांच्या आम्ही नोंदी ठेवल्या होत्या. त्यातील बालकांची वैद्यकीय तपासणी करून त्यातील ५५ बालकांची उपचारासाठी नोंदणी झाली आहे. सध्या काही बालकांच्या तपासण्या सुरू आहेत, त्यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, अशी माहिती डॉ. अल्पना कोंडेकर यांनी दिली.

पालकांचे समुपदेशन करणार

हा आजार अनुवांशिक असून पहिल्या बाळाला तो झाल्यास दुसऱ्या बाळाच्या वेळी काय काळजी घ्यावी. याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजारावरील उपचार खर्चिक असल्याने तणावाखाली वावरणाऱ्या पालकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

Story img Loader