मुंबई : नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापकाविरोधात आणखी १० विद्यार्थिनींनी चौकशी समितीसमोर तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी मुंबई महानगरपालिकेकडून सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या केंद्राकडून गुरुवारी पीडित तरुणीसह अन्य विद्यार्थिनींना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
हेही वाचा >>> राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम
सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राअंतर्गत तक्रार समिती आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीमार्फत ही चौकशी करण्यात आली. यावेळी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थिनींपैकी १० विद्यार्थिनीनी सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रारी दाखल केल्या. नायर रुग्णालयातील अंतर्गत समितीने सहाय्यक प्राध्यापक डॉ. भेटे यांची अन्य महाविद्यालयात बदली करण्याची शिफारस केली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेने डॉ. भेटे यांचे थेट निलंबन केले. तसेच या प्रकरणाची चौकशी सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपवून उच्चस्तरीय चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांकडून लेखी तक्रारी मागवल्या होत्या. त्यानंतर तक्रारी आलेल्या विद्यार्थिनींना साक्ष देण्यासाठी गुरुवारी सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. विद्यार्थिनींव्यतिरिक्त तीन कर्मचारीही सुनावणीसाठी उपस्थित होते.
हेही वाचा >>> गुजरातमधील व्यापाऱ्याचे ६८ लाख रुपये घेऊन नोकराचे पलायन
सुनावणीदरम्यान गुरुवारी अनेक विद्यार्थिनी तक्रारी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीसमोर आल्या. आम्ही सहायक प्राध्यापक, तसेच अधिष्ठाता यांच्याविरोधात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांच्या आधारे समितीने योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मि) या आंतरवासिता करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने दिला आहे.