मुंबई : आजारांपासून संरक्षण करणारी रोगप्रतिकारशक्तीच जेव्हा शरीराविरोधातच काम करण्यास सुरुवात करते, त्यावेळी सर्वात प्रथम ती मेंदू आणि मज्जासंस्थेवर आघात करते. अशा या न्यूरोइम्युनोलॉजीचा आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी नायर रुग्णालयात सुरू केलेल्या बाह्यरुग्ण विभागात मोठ्या संख्येने रुग्ण येऊ लागले आहेत. न्यूरोइम्युनोलॉजीने ग्रस्त जवळपास ३५० हून अधिक रुग्णांवर वर्षभरात उपचार करण्यात येत आहेत. न्यूरोइम्युनोलॉजी आजारासाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू करणारे नायर हे मुंबईतील पहिले रुग्णालय आहे.
वातावरणातील जीवाणू व विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करते. मात्र अनेक विषाणू व जीवाणूंमधील काही घटक हे शरीरातील मज्जासंस्थांशी साध्यर्म दाखविणारे असतात. त्यामुळे जीवाणू व विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करण्याऐवजी रोगप्रतिकारक प्रणाली शरीरातील घटकांवर हल्ला करते. हा हल्ला प्रामुख्याने मेंदू, मज्जासंस्था आणि त्याच्याशी जोडलेल्या रक्तवाहिन्यांवर होतो. रोग प्रतिकारशक्तीच्या प्रणालीचा हा हल्ला जेव्हा मेंदूवर होतो, त्यावेळी चक्कर येणे, उलटी येणे व आकडी येणे अशी लक्षणे दिसून येतात. लक्षणे त्वरित लक्षात येत नसल्याने रुग्णांना आपला जीवही गमवावा लागतो. करोनानंतर या रुग्णांमध्ये वाढ झाली. ही बाब लक्षात घेता नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायर रुग्णालयामध्ये प्रथमच न्यूरोइम्युनोलॉजी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला. आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. या दिवशी जवळपास १० ते १२ रुग्ण येत असतात. सीटी स्कॅन आणि अन्य तपासण्या केल्यानंतर हा आजार झाल्याचे लक्षात येते. या रुग्णांवर सातत्याने उपचार सुरू ठेवावे लागतात.
हेही वाचा…चेंबूरमधील पुनर्विकास प्रकल्प: कथित फसवणूकप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
शरीरावर होणारा करोनाचा प्रतिहल्ला रोखण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक प्रमाणात काम करत होती. यावेळी बऱ्याच व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती ही करोनाच्या विषाणूंऐवजी मज्जातंतूवर आघात करू लागली. त्यामुळे करोनानंतर या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. – डॉ. राहुल चकोर, न्यूरोलॉजी विभागप्रमुख.
रोगप्रतिकारशक्तीच्या आघाताची कारणे
-मेंदूज्वर झाल्यास मज्जातंतू प्रणालीवर परिणाम करतात.
-पाठीच्या कण्याला गंभीर इजा झाल्यास
-मज्जातंतूला संसर्ग झाल्यास
हेही वाचा…मुंबई : हत्या प्रकरणातील आरोपीला हैदराबाद येथून अटक
-आहार पद्धत, पचनसंस्था, रोगप्रतिकार शक्ती आणि मज्जातंतू यामध्ये परस्पर संबंध आहे. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आहार पद्धतीमध्ये झालेला बदलही यासाठी कारणीभूत असण्याची शक्यता
© The Indian Express (P) Ltd