दिल्लीतील श्रद्धा वालकर आणि निक्की यादव प्रकरणाने देशात खळबळ उडाली आहे. त्यातच मुंबईतील नालासोपाऱ्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून केला आहे. यानंतर प्रेयसीचा मृतदेह बेडमध्ये ठेऊन आरोपी पसार झाला होता. पण, गुन्हे शाखा २ च्या पथकाने त्याला मध्यप्रदेशातून अटक केली आहे.
हार्दिक शहा असे आरोपी तरुणाचं, तर मेघा मोरादी ( ३६ ) असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. हार्दिक आणि मेघा यांचं तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. सहा महिन्यांपासून ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते.
एक महिन्यापूर्वीच ते नालासोपारा पूर्वेच्या तुळिंज येथील सीता सदन या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहण्यासाठी आले होते. हार्दिक हा बेरोजगार होता, तर मेघा परिचारिका होती. त्यांच्यात सातत्याने आर्थिक कारणांवरून भांडणे होत असत. सोमवारी ( १३ फेब्रुवारी ) संध्याकाळी हार्दिकने मेघाच्या मावशीला मेसेज करून तिचा मृत्यू झाल्याचे कळवले. तसेच, मी पण आत्महत्या करणार असल्याचं हार्दिकने मेसेजमध्ये म्हटलं होतं.
हेही वाचा : मुंबई : पोलिसाच्या घरात घरफोडी करणारी बंटी-बबली जोडी अटकेत
यानंतर हार्दिकचा फोन बंद होता. मेघाच्या मावशीने याबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांना घराची तपासणी केली असता, मेघाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.
तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिलेल्या सांगितल्यानुसार, “पोलिसांना मृतदेह आढळला होता, तेव्हा मेघाच्या मृत्यूला ३६ तास झाले होते. तर, २४ तास आधीच हार्दिक पळून गेला होता. त्यामुळे खून केल्यानंतरही हार्दिकने काही काळ मृतदेहाबरोबर घालवले होते,” अशी धक्कादायक माहिती नगरकर यांनी दिली आहे.