अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, नरकाच्या कोंडवाडय़ात किती दिवस रहायचे आम्ही?
लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू गोलपठिय़ावर नागवणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास जवळ आलाय, अशा शब्दांचे सुरुंग पेरत प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देणारे आणि मराठी साहित्य विश्वात धरणीकंप घडवून आणणारे विद्रोही कवी-लेखक, ‘दलित पँथर’ या लढाऊ संघटनेचे संस्थापक नामदेव ढसाळ यांचे बुधवारी पहाटे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मल्लिका अमरशेख व मुलगा आशुतोष असा परिवार आहे.
साहित्यविश्वात नामदेव आणि राजकारणात दादा म्हणून परिचित असलेल्या ढसाळ यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो कार्यकर्त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलकडे धाव घेतली. उद्या सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव वडाळा येथील ‘सिद्धार्थ होस्टेल’ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता अंत्ययात्रा निघेल. दादर चौपाटीवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय व आंबेडकरी चळवळीतील नेते आमदार जयदेव गायकवाड यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतरचा काळात, म्हणजे ६० च्या दशकात दलितांवरील अन्याय-अत्याचाराने कळस गाठला होता. हा अन्याय बघून अस्वस्थ झालेल्या तरुणांपैकी नामदेव ढसाळ एक होते. पुणे जिल्’ाातील एका खेडय़ात जन्मलेल्या नामदेवने वडिलांबरोबर मुंबई गाठली. कामाठीपुरातील कुबट आणि दाहक जगण्याचा अनुभव घेत असतानाच ते किशोर वयातच शब्दांचे मनोरे रचत रस्त्यावच्या चळवळीत ओढले गेले. प्रजा समाजवादी पक्षात काम करता करता पुढे दलितांवरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात जशास-तसे उत्तर देणारी संघटना त्यांच्या डोक्यात घोंघावत होती. त्यातूनच १९७२ मध्ये त्यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’च्या धर्तीवर ‘दलित पँथर’ची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात आणि पुढे काही वर्षांतच या संघटनेने देशभर एक वादळ उठविले. ढसाळ यांच्याबरोबरच राजा ढाले, ज. वि. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर, लतिफ खाटिक आदी दमदार तरुणांनी आपल्या आक्रमक लेखणीने आणि वक्तृत्वाने प्रस्थापित साहित्य, संस्कृती, समाजकारण आणि राजकारणालाही धक्के द्यायला सुरुवात केली. १९७० च्या दशकातील नामदेव ढसाळ हे अशा एका विद्रोही विचार पर्वाचे शिल्पकार होते.
नामदेव ढसाळ यांच्या पहिल्याच ‘गोलपिठा’ कविता संग्रहाने मराठी साहित्यात भूकंपच घडवून आणला. त्यानंतर मराठी साहित्यात आणि वेगळ्या वाटने निघालेल्या दलित साहित्यात ढसाळांच्या विद्रोही शब्दांची नक्कल करण्याची स्पर्धाच सुरू झाली. परंतु अशी नक्कल करणाऱ्यांना त्यांच्या प्रतिभेची बरोबरी करता आली नाही. अथवा ती उंचीही गाठता आली नाही. गोलपिठानंतर, पुढे खेळ, मूर्ख्र म्हाताऱ्याने डोंगर हलविले, खेळ, प्रियदर्शनी, तूही यत्ता कंची, गांडू बगीचा इत्यादी कविता संग्रहांनी मराठी साहित्यात खळबळ माजवून दिली. त्यानंतर दलित साहित्यात विद्रोहाची एक प्रचंड अशी मोठी लाटच आली आणि त्याने मराठी साहित्यालाही आपली कूस बदलायला भाग पाडले.
रिपब्लिकन नेतृत्वाच्या सत्तालोलुप आणि गटबाजीच्या राजकारणाला दलित जनता कंटाळली होती. त्याच वेळी आक्रमकपणे मैदानात उतरलेल्या दलित पँथरच्या मागे दलित जनता भक्कमपणे उभी राहिली. दलित युवकांच्या लढाऊ संघटनेचे ढसाळांनी काही काळ नेतृत्व केले. परंतु पुढे ढाले यांच्याबरोबर वैचारिक वाद झाल्याने पँथरचेही अनेक गटात तुकडे झाले.
सर्व प्रकारचे इझम आडवे पाडून त्यांच्या पुढे जाणारा एक विद्रोही कवी म्हणून ढसाळ प्रसिद्धीच्या शिखरावर गेले. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. पुढे नामदेव ढसाळ यांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. अनेकदा निवडणुका लढविल्या. परंतु राजकारणात त्यांना कधीच यश मिळाले नाही. मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजाराने त्यांना गाठले. त्याच्याशी झुंजत असतानाच चार महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. पुन्हा त्याच्याशी लढणे सुरू झाले. गेले चार महिने त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्येच उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी पहाटे चार वाजता त्यांचे हॉस्पिटलमध्येच निधन झाले. विद्रोहाचा धगधगता अंगार थंड पडला!
नामदेव ढसाळ यांच्या साहित्यकृती
कविता संग्रह
* गोलपीठा (१९७३)
* खेळ (१९८३)
* मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५)
* तुही यत्ता कंची (१९८१)
* या सत्तेत जीव रमत नाही (१९९५)
* मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात
* तुझे बोट धरुन चाललो आहे
* आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी (१९७६)
* गांडू बगीचा (१९८६)
* आंधळे शतक – मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह)
नाटक
* अंधार यात्रा
कादंबरी
* हाडकी हाडवळा
* निगेटिव स्पेस्
विद्रोहाचा अंगार विझला!
अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले, नरकाच्या कोंडवाडय़ात किती दिवस रहायचे आम्ही? लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू गोलपठिय़ावर नागवणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास जवळ आलाय,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-01-2014 at 06:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namdeo dhasal passed away