‘समृद्धी’ला बाळासाहेबांच्या नावासाठी सेना, तर वाजपेयींसाठी भाजप आग्रही
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचे काम अद्याप सुरूही झाले नसताना त्याच्या नामकरणावरून युतीमध्येच वाद निर्माण झाला आहे. या मार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची शिवसेनेची मागणी आहे, तर दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची तयारी भाजपने आधीच सुरू केली आहे.
मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ५६ हजार कोटी रूपये खर्चाच्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला असतानाच आता या महामार्गाच्या नामकरण वादावरून मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
तब्बल १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्य़ांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.
मंत्रिमंडळाची बैठक संपताच मंगळवारी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री(सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच काही आमदारांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या महामार्गस बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केली. देशातील पहिल्या वहिल्या मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेबांनी रोवली होती. त्यामुळे देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचा, त्यांच्या दृरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी करणारे पत्र शिंदे यांनी मुख्यमंत्र्याना दिले.
मुख्यमंत्री नाराज
या घडामोडींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे समजते. ‘‘जे चाललंय ते चांगलं चाललं आहे. आपण एकत्र काम करीत आहोत. या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली आहे. अशा वेळी नको तो वाद कशाला निर्माण करता? अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका,’’ अशा शब्दांत त्यांनी शिवसेना नेत्यांना सुनावले. त्यामुळे आगामी काळात या मार्गाच्या नामकरणाचा वाद अधिकच पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राजीनाम्याची तयारी?
अटलजींबद्दल आम्हालाही प्रेम असून देशातील अन्य प्रकल्पांना त्यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान कराच. पण बाळासाहेबांचे योगदानही मोठे असून त्यांचेच नाव या महामार्गाला द्यावे, अशी मागणी एकनाथ शिंदे आणि अन्य शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांमध्ये काहीशी शाब्दिक चकमकही झाली. तेव्हा ठाकरेचे नाव न दिल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेच्या मंडळींनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.