मुंबई : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील ७ लाख ७४ हजार १४८ लाभार्थी शासनाच्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चाही लाभ घेत असल्याचे उघड झाले. त्यामुळे या लाभार्थींना लाडकी बहीण योजनेतील फरकाचे ५०० रुपये मिळणार आहेत.

केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सन्मान निधी’ योजनेचे राज्यात एकूण १९ लाख २० हजार लाभार्थी आहेत. तेवढीच संख्या राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेतील लाभार्थींची आहे. या लाभार्थींना केंद्र आणि राज्य सरकारकडून वर्षाला प्रत्येकी सहा हजार असे एकूण १२ हजार रुपये मिळतात. जानेवारीत २ कोटी ४६ लाख लाडक्या बहिणींपैकी पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. याच महिन्यात लाडक्या बहिणींमधील केसरी व पिवळे शिधापत्रिकाधारक वगळता इतर अर्जांची पडताळणी केली जाईल, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले होते.

काही काळ ठप्प झालेली ही पडताळणी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा लाभ घेणाऱ्या १९ लाख २० हजार शेतकरी कुटुंबातील ७ लाख ७४ हजार १४८ लाडक्या बहिणी शासकीय योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बहिणींना शासकीय योजनेतील एक हजार रुपये मिळत असल्याने ‘लाडकी बहीण’ योजने अंर्तगत त्यांना ५०० रुपये मिळणार आहेत.

शासकीय योजनेत १५०० रुपयांहून कमी लाभ मिळणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम (५०० रुपये) सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. हा निर्णय गेल्या वर्षीच्या २८ जून व ३ जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात निवेदन करण्यात आले आहे.

७७ कोटी रुपयांची बचत

पडताळणीत यापूर्वी निकषामध्ये न बसणाऱ्या ५ लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे. यामुळे शासनाच्या ७५ कोटी रुपयांची बचत झाली. त्यात ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ७ लाख ७४ हजार १४८ लाडक्या बहिणींचे एक हजार रुपये कमी होणार आहेत. एक हजार रुपये बचत होणार असल्याने शासनाचे ७७ कोटी ४१ लाख ४८ हजार रुपये वाचणार आहेत.