मुंबई : मालाड परिसरात दरोड्यादरम्यान पोलीस पथकावर दगडफेक करून प्राणघात हल्ला करणाऱ्या आरोपीला २६ वर्षांनंतर अटक करण्यात अखेर दिंडोशी पोलिसांना यश आले. शंकर बाजीराव काळे ऊर्फ नाना असे या ५५ वर्षीय आरोपीचे नाव असून सहा महिने कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. अखेर २६ वर्षांनी त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मालाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एलोरा सहकारी सोसायटीमध्ये ५ ऑक्टोंबर १९९६ रोजी चड्डी बनियान टोळीने सशस्त्र दरोडा टाकला होता. पळून जाताना या आरोपींना गस्त घालणार्‍या पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी या आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली होती, घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात काही पोलिसांसह साक्षीदार गंभीररीत्या जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ आरोपींच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात चड्डी बनियान टोळीचा म्होरक्या चकमकीत मारला गेला. त्याचे चार सहकारी चोरीच्या मुद्देमालासह अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानंतर पथकाने पळून गेलेल्या तिघांना संभाजीनगर परिसरातून अटक केली होती. त्यात शंकर काळे याचाही समावेश होता. सहा महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता.

हेही वाचा – बदलापूर प्रकरण : न्यायालयीन कामकाजात ढवळाढवळ करू नका, मृत आरोपीच्या कुटुंबीयांच्या वकिलांना उच्च न्यायालयाची ताकीद

जामिनावर बाहेर येताच शंकर काळे पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीस सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोध मोहीम सुरू असताना शंकर सांताक्रुज येथील के. के गांगुली मार्गावरील एकता चाळीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी तेथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. याचदरम्यान शंकर किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचा – “मुंबई पादचारी व सायकलस्वारांसाठी योग्य शहर नाही”, मुख्य सचिवांनीच मांडली मुंबईकरांची व्यथा; बकालीकरणावर भाष्य!

सुरुवातीला त्याने आपण शंकर काळे नसल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशी केल्यानंतर तो या गुन्ह्यांतील आरोपी शंकर असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील न्यायालयात हजर करण्यात आले. गेल्या २६ वर्षांपासून शंकरचा शोध सुरू होता. अखेर त्याला पकडण्यात यश आले.