सामाजिक कार्याला आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ रूपी दानयज्ञाचा आज, बुधवारी सोहळा  होत आहे. ‘लोकसत्ता’च्या वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमात आतापर्यंत सुमारे एक कोटी रुपयांचा धनसंचय झाला असून मदतीचा ओघ अद्यापी सुरूच आहे. मात्र, आता स्वल्पविराम घेत संबंधित संस्थांना प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप होणार आहे.
सत्कार्याचा भर पेलण्यासाठी हजारो हात स्वेच्छेने सरसावतात हेच ‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दहा सामाजिक संस्थांचा परिचय करून देण्यात आला. त्यात मुंबईची समतोल फाऊंडेशन, डोंबिवलीची मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिकची प्रबोधिनी ट्रस्ट, पुण्याची भारत गायन समाज, चिंचवडची झेप पुनर्वसन केंद्र, मिरजेचे खरे वाचन मंदिर, नागपूरचे विमलाश्रम, बीडची इन्फंट इंडिया, रत्नागिरीची वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि नगरची वाय. एस. साने इंद्रधनु प्रकल्प आदी संस्थांचा समावेश होता. या सर्वच संस्थांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या सत्कार्याला हातभार लावण्यासाठी मदतीची हाक ‘सर्वकार्येषु..’च्या माध्यमातून देण्यात आली होती. वाचकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाच्या यशाचे हे गमक. आता वेळ आली आहे संचित धन संबंधित संस्थांना सुपूर्द करून त्यांच्या कौतुकसोहळ्याची.. दातृत्वाला सलाम करण्याची..!
कार्यक्रमाचे ठिकाण : लोकसत्ता कार्यालय, एक्स्प्रेस टॉवर, नरीमन पॉइंट, मुंबई
प्रक्षेपण – indianexpress-loksatta.go-vip.net आणि YouTube.com/LoksattaLive वर सायंकाळी पाच वाजल्यापासून

Story img Loader