मराठी साहित्यात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकावर लवकरच चित्रपट निर्माण होणार असून त्यात बापाची भूमिका अभिनेते नाना पाटेकर करणार आहेत, तर संजय पवार पटकथा तयार करीत आहेत, अशी माहिती प्रसिध्द विचारवंत व केंद्रीय वित्त आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे दिली.
येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘आमचा बाप..’ या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. परदेशी भाषांमधील अनुवादानंतर या पुस्तकाला डोक्यावर घेणारे रसिकही आपणास भेटल्याचा उल्लेख डॉ. जाधव यांनी केला. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी  पुस्तके लिहिली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला. रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयीही तीन पुस्तके लिहिली. त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्वाची महती मराठी वाचकांना कळावी, साहित्यातील अमाप योगदान कळावे, हा यामागील हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी होते. प्रास्तविकात कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी वाचनालयाच्या १२५ वर्षांच्या कालखंडाचा आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक समितीच्या अध्यक्ष डॉ. सुशीलबेन शहा यांनी करून दिला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. गिरीश बापट, आ. जगदीश वळवी, नगराध्यक्ष अॅड. संदीप पाटील, पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी उपस्थित होते. स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद गुजराथी, उपाध्यक्ष प्रदीप जैन,  डॉ. परेश टिल्लू, सोमनाथ बडगुजर यांनी केले. वाचनालयाच्या स्मरणिकेचे तसेच चोपडय़ाच्या साहित्यिक पौर्णिमा हुंडीवाले लिखीत ‘ब्लॅक फॉरेस्ट’, ‘बोन्साय’ आणि ‘फक्त एकदा’ या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. जाधव, आ. बापट यांच्या हस्ते झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा