सत्कार्याचा भार पेलण्यासाठी हजारो हात स्वेच्छेने सरसावतात, हे ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. विधायक कामातून मानवतेचा आदर्श समाजासमोर उभा करणाऱ्या दहा सेवाभावी संस्थांचा परिचय गणेशोत्सव काळात सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमातून लोकसत्ताने करून दिला आणि त्या संस्थांच्या कार्यास आर्थिक हातभार लावण्यासाठी लोकसत्ताच्या हजारो वाचकांची अक्षरश रीघ लागली. या संस्थांकरिता ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात मदतीच्या धनादेशांचा अखंड ओघ सुरू झाला.
वाचकांच्या या प्रेमाचा आणि मानवतेच्या जाणिवांचा जागर येत्या बुधवारी, १६ ऑक्टोबर रोजी, मुंबईत एक्स्प्रेस टॉवर्स येथील लोकसत्ता कार्यालयात पार पडणार आहे. निमंत्रितांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते देणग्यांचे धनादेश संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. विधायक कामांना भरघोस पाठिंबा मिळतोच, पण अशा कामांना समाजातून भक्कम पाठबळही मिळते, या अनुभूतीचा हा कार्यक्रम आगळा सोहळा ठरणार आहे.    

Story img Loader