मुंबई / ठाणे : विधानसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचा दावा विरोधी पक्षांनी गुरुवारी केला. मतदानाच्या दिवशी आकडेवारी ५८.२२ टक्क्यांवर असताना दुसऱ्या दिवशी मात्र ती ६६.०५ टक्क्यांपर्यंत कशी गेली, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पोस्टलमध्ये सर्वाधिक मते असताना मतमोजणीत मात्र हा कल कायम राहिला नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मतदान यंत्रांबाबत शंका उपस्थित केली.
मतदानाचा दिवशी आलेल्या मतटक्क्यांमध्ये दुसऱ्या दिवशी तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे पटोले यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निदर्शनास आणून दिले. महाविकास आघाडीकडून ईव्हीएमविरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात टिळक भवन येथे सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या पराभूत व विजयी आमदारांची बैठक पार पडली. बैठकीत पुन्हा एकदा ईव्हीएमविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के, रात्री ११.३० वाजता ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी ६६.०५ टक्के इतके मतदान झाल्याचे सांगण्यात आले. इतके मतदान कसे वाढू शकते असा सवाल पटोले यांनी केला. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदही घेतली नाही. यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनीही हाच मुद्दा उचलून धरला. सायंकाळी ६ ते रात्री ११ यावेळेत अचानक मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते कशी आणि वाढीव मतदान येते कुठुन, असा सवाल त्यांनी केला. मतदान यंत्र हे मानवनिर्मित असल्यामुळे त्यात बदल करणे शक्य आहे. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये मतदानाचा आकडा लगेचच उपलब्ध होतो. तरीही मतदानाची आकडेवारी देण्यास उशीर कसा काय होतो, असे आव्हाड म्हणाले. नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली मते जवळपास एकसारखीच असून एखाद्या पॅर्टनशिवाय हे शक्यच नाही, असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा >>>कोठडी मृत्यू प्रकरण : पोलीस उपनिरीक्षक ३१ वर्षांनी दोषमुक्त
टक्केवारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी मतदान केंद्रांवर २-३ किलोमीटर रांगा असायला हव्या होत्या. या रांगांचे सीसीटीव्ही फुटेज जारी करावे.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस</strong>
मी २०१४ पासूनच मतदान यंत्राच्या धोक्याबाबत बोलत आहे. मी हेच सांगत होतो की, छोटी राज्ये देतील आणि मोठी राज्य ताब्यात घेतील. त्याकडे आमच्या लोकांचे दुर्लक्ष झाले.- जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी (शप)
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश आले तेव्हा मतदानयंत्रे योग्यपद्धतीने काम करत होते, यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यावर मात्र ते मतदानयंत्रांना दोष देत आहेत.- अजित पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी (अप)