पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे. राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार विरोधकांना बोलू दिले नाही. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही असे सांगत आहेत. बोगस बियाणामुळे कापसाचे पीकच आले नाही, पिक वाया गेले व वर्षही वाया गेले. मागील वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्याच्या घरात पडून आहे.”
हेही वाचा : VIDEO : विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलनात राष्ट्रवादीचे आमदार का नव्हते? ठाकरे गटातील नेते म्हणाले…
“शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकरी व जनतेला लुटण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा सरकारने केली पण अजून मदत मिळालेली नाही. जनतेच्या प्रश्नावर सरकारने उत्तर दिले पाहिजे पण बहुमताच्या जोरावर राज्य सरकार उत्तर देण्यापासून पळ काढत आहे. जनतेने काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेस पक्ष विरोध पक्षाची जबाबदारी योग्यरितीने पार पाडत सरकारला जाब विचारत राहिल. सभागृहात बोलू दिले नाही तर रस्त्यावर संघर्ष करु,” असा निर्धार नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : VIDEO : शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून थोरात-फडणवीस आमने-सामने, नेमकं काय घडलं? वाचा…
“महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचे पाप भाजपा सरकारने केले आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना राज्य सरकार गोव्याच्या धर्तीवर कॅसिनो सुरु करण्याचे पाप करत आहे. आधीच किराणा दुकानात बियर विकण्यास परवानगी दिलेली आहे. मुंबईसह राज्यात डान्स बारचा सुळसुळाट आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार कॅसिनो सुरु करून तरुण पिढीला बरबाद करण्याचे पाप करत आहे. काँग्रेस पक्षाचा राज्यात कॅसिनो सुरु करण्यास विरोध राहील,” असेही नाना पटोले यांनी सांगितलं.