मधु कांबळे
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीबरोबर किंवा स्वबळावर लढलो तरी राज्यात काँग्रेस हाच क्रमांक एकचा पक्ष असेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेसला मोठे यश मिळू शकते. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आला. जागावाटपासाठी प्रत्येक पक्षाच्या तीन प्रतिनिधींची मिळून एक समिती स्थापन करण्याचे ठरले. आगामी निवडणुका व काँग्रेस पक्षाची रणनीती काय असेल, याबाबत २१ मेला उस्मानबादमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत व २३ मे रोजी मुंबईत होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती पटोले यांनी दिली.
जागावाटप कळीचा मुद्दा
कोकण पट्टय़ात काँग्रेस कमकुवत आहे, परंतु या वेळी लोकसभेची एक तरी जागा निवडून आणू, तसेच विधानसभेच्या किमान सहा जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला आहे. आघाडीत जागावाटप हा कळीचा व अडचणीचा मुद्दा ठरणार आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याची काँग्रेस नेत्यांनी अनेकदा घोषणा केली होती. परंतु १ मे रोजी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर सभेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईत भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडी करून एकत्र निवडणुका लढविण्याची तयारी असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुंबईत पक्षाच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष ठरणार आहे, त्यामुळे आम्ही या निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे पटोले यांचे म्हणणे आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत काल रविवारी झालेल्या बैठकीतही त्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाडवर काँग्रेसचा दावा
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६ मेला महाड येथे सभा घेऊन काँग्रेसमधून त्यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप या त्यांच्या विधानसभेच्या संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत दिले होते. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केला आहे. सोमवारी रायगड जिल्ह्याचे प्रभारी चारुलता टोकस, श्रीरंग बरगे व राणी अग्रवाल यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन महाडची जागा काँग्रेसकडेच रहावी, अशी मागणी केली. त्याला पटोले यांनीही मान्यता दिली. त्याचबरोबर अध्यक्षांच्या आदेशानुसार ठाकरे गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप व हनुमंत जगताप यांना पदावरून निलंबित करण्यात आले असून महाड तालुका काँग्रेस समितीही बरखास्त करण्यात आली आहे.