काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं. तसेच राज्य सरकारने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना, मग ते कोणीही असो सभा घ्यायला बंधनं घातली पाहिजेत, अशी मागणीही केली. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, “खरंतर हिंदू-मुस्लीम हा वाद महागाईवरून लोकांचं लक्ष बाजूला सारण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आमची राज्य सरकारला विनंती आहे की अशा पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना, मग ते कोणीही असो त्यांना सभा घ्यायला बंधनं घातली पाहिजेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रात एकात्मता आणि भाईचारा संपवण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल त्याला शासन केलं पाहिजे, ही मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने करतो आहे.”
“मी स्वतः हिंदू, दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण…”
“कोणालाही आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याला विरोध करण्याचं काही कारण नाही, पण त्याचा जो बाऊ केला जातोय तो अडचणीचा मुद्दा आहे. मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही. धार्मिक तेढ निर्माण केला जातोय आणि महागाई बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यात केंद्रातील सरकारचं अपयश समोर येतंय,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ४० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला”
नाना पटोले पुढे म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार देशात ४० लाख लोकं करोनामुळे मृत्यू पावले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ४० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. अशाप्रकारचे प्रश्न आहेत. त्यामुळे केंद्राचं अपयश लपवण्यासाठी देशात हा धार्मिक तेढ निर्माण केला जातोय हे स्पष्ट झालंय. त्यांच्या या प्रचाराला जनता बळी पडणार नाही.”
हेही वाचा : “‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणाऱ्या भाजपाला…”, नाना पटोले यांची मोठी मागणी
“पोटनिवडणुकीत जनतेने भाजपाचा सुपडा साफ केला”
“देशात ज्या पोटनिवडणुका झाल्यात त्यात जनतेने भाजपाचा सुपडा साफ केला. महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये ती परिस्थिती पाहायला मिळाली. जनता सतर्क झालीय. जनता जनार्दनला सगळं कळतं. मूळ मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. याला लोक मान्य करणार नाही,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.