लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असून अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपाला लक्ष्य केलं आहे.
नाना पटोले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना ऑर्गनायझर या साप्ताहिकातील टीकेबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, आता भाजपा संघाचं ऐकत नाही, तरीही संघ त्यांना सुचना का करतो? असा प्रश्न जनतेला पडला आहे, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
हेही वाचा – मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का?
नेमकं काय म्हणाले नाना पटोले?
“संघ भाजपा सुचना देते की नाही, हे आम्हाला माहिती नाही. मात्र, सध्या भाजपा संघाचं ऐकत नाही. हे स्पष्ट आहे. आम्हाला संघाची आवश्यक नाही, हे भाजपाच्या नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे संघ त्यांना सुचना का करते? असा प्रश्न देशातील जनेतला पडला आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
ऑर्गनायझरमध्ये नेमकी काय टीका करण्यात आली?
दरम्यान, ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख लिहिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराक असल्याचे ऑर्गनायझर लेखात म्हटले आहे.
हेही वाचा – भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संघाशी संबंधित महिला, दलित किंवा ओबीसी नेत्याची वर्णी?
याशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याची टीकाही या लेखातून करण्यात आली आहे. “महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, असंही रतन शारदा यांनी म्हटलं आहे.