Nana Patole : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि राज्यात विविध ठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीने आज राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, राजकीय पक्षांनी अशाप्रकारे बंद पुकारणं बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने हा बंद रद्द करण्यात आला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पटोले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना उच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार त्यांच्या बगलबच्च्यांना न्यायालयात पाठवून असा प्रकारे स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

हेही वाचा – Sharad Pawar in Pune Protest: “मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की…”, शरद पवारांनी मांडली भूमिका; पुण्यात भर पावसात आंदोलन, उपस्थितांना दिली शपथ!

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

“उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. याप्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयातही गेलो असतो. मात्र, आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. आज महाराष्ट्रात ज्या काही घटना घडत आहेत, त्यावरून लहान मुलं शाळेतसुद्धा सुरक्षित नसल्याचं चित्र आहे. यावरून लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आम्ही राजकीय उद्देशाने महाराष्ट्र बंदची हाक दिली नव्हती. लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेता त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभा राहावं अशी जनतेची भावना होती. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र बंदची हात दिली होती, पण सरकार आपले बगलबच्चे न्यायालयात पाठवून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“याला सरकार आणि पोलीस महासंचालक दोघेही जबाबदार”

“राज्यातलं सरकार केवळ स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. बाकीची मेले तरी चालतील, पण आपण वाचलो पाहिजे, अशी या सरकारची भूमिका आहे. त्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक अकार्यक्षम आहेत. त्या महासंचालक पदावर कशा पोहोचल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे आज महाराष्ट्राच्या ज्या घटना घडत आहेत, त्याला सरकार आणि पोलीस महासंचालक हे दोघेही जबाबदार आहेत”, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut: ‘न्यायदेवताही स्त्री, राज्यघटनेवरही बलात्कार’, बंद रद्द झाल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले?

“…पण जनता या सरकारला वाचवणार नाही”

“चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करायची, त्यांच्यावर दबाव आणायचा, त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्या बदल्या करायच्या, असा प्रकार आज महाराष्ट्रात सुरू आहे. एकेकाळी महाराष्ट्राची पोलीस दल हे देशात नंबर एकचे पोलीस दल म्हणून ओळखलं जात होतं. आज पोलीस दलाची परिस्थिती वाईट झाली आहे. आता पोलिसांच्या घरीच घरफोड्या होत आहे. माहीमध्ये एकाच रात्रीत १३ पोलिसांच्या घरी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? या सरकारने आपल्या बगलबच्चांना पाठवून स्वतःचा बचाव करून घेतला. मात्र, या निवडणुकीत जनता या सरकारला वाचवणार नाही”, अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticized shinde govt maharashtra bandh high court order spb