काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज(गुरुवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मंत्रिमंडळातील बदलाचे संकेत दिल्यानंतर नाना पटोले आज मुख्यमंत्र्यांच्या भेटील गेल्याने या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवाय, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची देखील सर्वांना उत्सुकता होती. अखेर या भेटीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले यांनी सांगितले की, “सरकारचं जे काही कामकाज झालं त्यातील काही त्रुटी ज्या होत्या, या तीन पक्षाच्या सरकारमध्ये ज्या काही अडचणी होत्या, त्यातील काही भूमिका त्यांच्या समोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी देखील जे काही प्रश्न मधल्या काळात निर्माण झाले त्या प्रश्नांचं निरसंन करून, अजून सक्षमतेने हे सरकार पुढे राज्याच्या जनतेसाठी काम करेल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलं. ”

तर, कोणत्या अडचणी तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्या? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीने विचारल्यावर नाना पटोले म्हणाले की, “उर्जा विभागाचा एक महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये मागील सरकारने केलेल्या चूका आणि त्याचे परिणाम हे राज्याच्या सगळ्या शेतकऱ्यांपासून ते उद्योगपतींना आणि छोट्या ग्राहकांना देखील त्याची माहिती आहे आणि त्याचे परिणाम सर्व विद्यूत ग्राहकांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याचं काम होतय. शेतकऱ्यांची असो किंवा उद्योजकांची कुणाचीही वीज कापली जाऊ नये आणि महत्वाचं म्हणजे जो काही पैसा आहे तो कसा उभा करता येईल याबाबत चर्चा झाली. निधी वाटपाचा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे की, त्यामध्ये समान निधी वाटप करून राज्याचा समान विकास कसा होईल, त्यावर एक चर्चा झाली. अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. ”

तसेच, “संजय राऊत यांनी जे काही आरोप केले, त्या आरोपांची चौकशी तातडीने व्हावी आणि गृहमंत्र्यांनी यावर सातत्याने लक्ष ठेवून, त्याला ठराविक कालावधीत याची चौकशी पूर्ण करावी आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आम्ही काँग्रेस पक्षाकडून मांडली. ” असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

याचबरोबर, मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या दृष्टीने काय चर्चा झाली अशी विचारणा करण्यात आल्यानंतर, “मंत्रिमंडळातील बदलाचा निर्णयाची चर्चा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे करतील. ” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोलेंनी दिले राज्यातील राजकीय भूकंपाचे संकेत; म्हणाले, “१० मार्च रोजी…”

“ महाराष्ट्रामध्ये १० मार्च रोजी राजकीय भूकंप येणार आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये अनेक मोठे बदल लवकरच दिसून येतील. ” असा दावा नाना पटोले यांनी केलेला आहे. कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे.