मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या, बुधवारी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत विविध पातळ्यांवर दिवसभर प्रयत्न सुरू होते. ‘शिवसेननेने परस्पर चारही मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. माघारीच्या चर्चेसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही, अशी हतबलता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्याने लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आशा पल्लवीत झालेल्या महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत.
मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत आणि भाजपचे किरण शेलार यांनी अर्ज भरले आहेत. शिवसेनेने माघार घ्यावी, असे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. कोकण पदवीधरमध्ये भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. नाशिक शिक्षकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भावानेच उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात दिवसभर कोणी माघार घ्यावी यावर काथ्याकूट सुरू होता. उभय बाजूने ताठर भूमिका घेतली होती. शेवटी राज्य भाजपच्या नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येते. मुंबई पदवीधरमध्ये माघार घेण्यास भाजप आणि शिंदे गट दोघांचीही तयारी नाही. त्यातून तिढा निर्माण झाल्याचे समजते.
हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका ; मुख्यमंत्र्यांची कबुली; कांदा, दूध, कापसाच्या दरांवरून रोष भोवला
उद्धव ठाकरे यांच्यावरच थेट आरोप
महायुतीत जागावाटपाचा तिढा निर्माण झाला असतानाच महाविकास आघाडीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच हल्ला चढविला. शिवसेनेने चारही जागांवर परस्पर उमेदवार उभे केले आहेत. मुंबईतील दोन्ही जागा शिवसेनेने लढविणे ठिक होते. कोकण आणि नाशिकच्या जागांवर काँग्रेसचा दावा होता. उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत चर्चेतून काही तोडगा काढला जाऊ शकतो. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ठाकरे यांच्याशी संपर्क साधणे कठीण असल्याचा अनुभवही पटोले यांनी कथन केला.
नाशिक शिक्षकमधून काँग्रेसचे संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली जाणार होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेची उमेदवारी दिली. लोकसभेत राज्यातील ३० जागा जिंकल्याने महायुतीच्या नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण निकाल लागून आठवडा उलटण्याच्या आतच पटोले यांनी ठाकरे यांच्यावर जागावाटपावरून खापर फोडले.