शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला. हा विषय विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. महाविकासआघाडीतील नेत्यांनी भिडेंच्या वक्तव्यावर गंभीर आक्षेप घेत, त्यांच्या अटकेची मागणी केली. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना फाशी देणार का? असा सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाना पटोले म्हणाले, “राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितलं होतं की, महापुरुषांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांच्या केवळ मुसक्या न बांधता त्यांना रस्त्यावर फाशी द्यावी, असं त्यांचं मत आहे. आता आमचा सवाल आहे की, देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना फाशी देणार का?”

“ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्याला द्वेषपूर्ण भाषणाची मुभा”

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, “आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक करायला हे तयार आहेत. मात्र, ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्या नालायक माणसाला द्वेषपूर्ण भाषण देण्याची मुभा आहे. हे कोणतं राजकारण आहे आणि हा शासन चालवण्याचा कोणता प्रकार आहे.”

“भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही, तर…”

“आम्ही रविवारपर्यंत (३० जुलै) शांत बसू. तोपर्यंत संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही, तर आम्ही आंदोलन छेडू. तेव्हा ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत,” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी सरकारला दिला.

हेही वाचा : भिडेंना गांधीद्वेष भोवला, अमरावतीत गुन्‍हा दाखल; लोकांमध्‍ये असंतोष पसरवत असल्याचा ठपका

“संभाजी भिडे दरवेळी काही तरी वादग्रस्त वक्तव्य करतात”

संजय शिरसाट म्हणाले, “संभाजी भिडेंनी अशी वादग्रस्त वक्तव्ये करू नये, असं माझंही मत आहे. ते दरवेळी काही तरी वादग्रस्त वक्तव्य करतात. माझ्या शेतातली आंबे खा म्हणजे पोरं होतात हा कोणता तर्क आहे. असं बोलणं योग्य नाही. संभाजी भिडेंचा कुणी सन्मान करत असेल, तर याचा अर्थ तोंडात येईल ते बोलणं योग्य नाही. मीही त्यांचा निषेध करतो.”

“समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे”

“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सांगणार आहे की, अशी वारंवार वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर एकदा तरी कारवाई झालीच पाहिजे,” अशी मागणी संजय शिरसाटांनी केली.

हेही वाचा : “संभाजी भिडे बोलले ते इतकं…”, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना भावना अनावर; म्हणाले, “मला खरी चिंता…!”

“संभाजी भिडे भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत”

नाना पटोलेंच्या टीकेवर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नाना पटोलेंनी जरा अभ्यास करून बोललं पाहिजे. संभाजी भिडे वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. ते भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत आणि कुठल्याही पदावरही नाही. त्यामुळे संभाजी भिडेंचा संबंध भाजपाशी जोडणे योग्य नाही.”

“भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करणे सरकारची जबाबदारी”

“संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केलं आहे त्याची चौकशी करणे सरकारची जबाबदारी आहे. त्या वक्तव्याचा काही विपर्यास झाला आहे का त्याची सरकार चौकशी करेल आणि योग्य विचार करेल,” असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole question devendra fadnavis over sambhaji bhide controversial statement pbs
Show comments