पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या मुंबई दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला आहे. एखाद्या गटाराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करावं, हे पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं आहे, असे ते म्हणाले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले नाना पटोले?
”पंतप्रधान उद्घाटन करत असेल्या कामांमध्ये काही गटारांची कामंही आहेत. देशाच्या पंतप्रधांनी गटारांचं उद्घाटन करणं म्हणजे पंतप्रधान पदाला एकप्रकारे धक्का लावण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. नरेंद्र मोदी हे गेली आठ-नऊ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांनी भाजपाचा प्रचार केल्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. मुळात पंतप्रधानांनी महापालिकेच्या प्रचाराला यावं की ग्रामपंचायतील यावं, हा त्यांचा वयक्तीक विषय आहे. त्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही. पण गटाराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करावं, हे मात्र पंतप्रधानपदाच्या प्रतिमेला ठेच पोहोचवणारं आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
”या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला द्यावीच”
पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याचं भूमीपूजन केलं होतं, त्याचं काय झालं? राज्यपाल असेल किंवा भाजपाचे नेत सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. आज मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो आहे. गुजरात निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेले, या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला द्यावीच लागतील, असेही ते म्हणाले.