एनसीबीचे माजी तपास अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु करण्यात आली. त्यांच्या सीबीआय चौकशीचा सलग तिसरा दिवस आहे. रविवारी जेव्हा ते चौकशी संपवून बाहेर आले तेव्हा त्यांनी सत्यमेव जयते एवढंच म्हटलं. आता त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावरुन गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे हे भाजपाची पोलखोल करु शकतात असं आता नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत नाना पटोले?
“समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीत काहीतरी काळंबेरं आहे. दाल में कुछ काला है. वानखेडेंजवळ भाजपा आणि संघाची पोलखोल करु शकतात अशा काही वस्तू आहेत. समीर वानखेडे हे संघाच्या मुख्यालयात जाऊन संघप्रमुखांना भेटून आले. त्यानंतर त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला. भाजपाचे राज्यातले नेते म्हणत होते की समीर वानखेडेंच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही पाहून घेऊ. सीबीआय आणि ईडी ही केंद्र सरकारची दोन माकडं आहेत. यापैकी सीबीआय समीर वानखेडेंची चौकशी करतं आहे. आता भाजपाचे लोक कुठे गेले?” असा प्रश्नही नाना पटोलेंनी विचारला आहे.
समीर वानखेडेंबाबत असं काय घडलं की, मोहन भागवतांना भेटल्यानंतर चौकशीचा ससेमिरा मागे का लागला. यामध्ये काही ना काही गोष्टी समोर येतील. यामध्ये काही ना काही लपलेलं आहे. काही गोष्टी संशयास्पद आहेत, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
जागा वाटपाविषयी काय म्हणाले पटोले?
]प्रत्येक पक्षाने चाचणी केलीच पाहिजे मात्र जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होणार आहे. मविआतील ज्या पक्षाचे मेरिट जेथे असेल त्याप्रमाणे तिथले निर्णय होतील. पारंपारिक मतदार संघ हा विषय वेगळा आहे. वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात. जागा वाटपाबाबत आम्ही काही कमिट्या तयार केलेत त्यात मेरिटच्या आधारावर चर्चा होईल, असं पटोले म्हणालेत.