“भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे,” असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. तसेच याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवालही नाना पटोले यांनी केलाय. त्यामुळे राज्यात महाविकासआघाडीत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पटोले म्हणाले, “भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. ३० जानेवारी २०२२ रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.”

“राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले”

“महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी मी सातत्याने संपर्क साधला. त्यांच्याशी भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापती निवडणुकीत आघाडीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत आम्हाला ताटकळत ठेवले आणि ऐनवेळी भाजपासोबत जाऊन पंचायत समित्यांमध्ये आणि गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली,” असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हात मिळवणी”

“जयंत पाटील यांनी मी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला होता हे मान्य केले आहे. त्यांना भाजपसोबत जायचे आहे हे त्यांनी अगोदरच सांगितले असते तर आम्हाला काही अडचण नव्हती, पण आम्हाला अंधारात ठेवून भाजपसोबत हात मिळवणी केली याचे दुःख आहे,” असं म्हणत पटोलेंनी त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली.

“दगाफटका खपवून घेणार नाही, राष्ट्रवादीबाबत पक्षश्रेष्ठींना सांगणार”

नाना पटोले पुढे म्हणाले, “प्रामाणिकपणे मैत्री करणे आणि मैत्री निभावणे ही काँग्रेसची भूमिका आहे. आम्ही कायमच आघाडी धर्म पाळला आहे. आम्ही समोरून लढतो पाठीमागून वार करत नाही. माझ्यावर टीका करणाऱ्यांची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे. त्याबाबत मी काही बोलण्याची गरज नाही. गेली अडीच वर्ष सत्तेत सोबत राहून राष्ट्रवादीने आम्हाला कशी वागणूक दिली या संदर्भात मी पक्षश्रेष्ठींना अवगत करणार आहे.”

हेही वाचा : राष्ट्रवादीने पाठीत सुरा खुपसला म्हणणाऱ्या नाना पटोलेंना जयंत पाटलांनी दिलं उत्तर; म्हणाले, “एकला चलो…”

“आम्ही परिणामाची चिंता करत नाही”

“दगाफटका खपवून घेणार नाही. आम्ही कधीही सत्तेसाठी लांगूनचालन केले नाही. परिणामांची चिंता करायला काँग्रेस सक्षम आहे. आम्ही जे काही करतो ते खुलेआम करतो. काँग्रेस पक्ष देशाच्या विकासाची आणि विचारांची लढाई लढत आहे. आम्ही परिणामाची चिंता करत नाही,” असं म्हणत पटोले यांनी राष्ट्रवादीला इशारा दिलाय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole serious allegations on ncp jayant patil praful patel pbs