उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर देशभरात या घटनेची चर्चा होतेय. त्यातच उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना रोखल्यानं आता काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या कारवाईवरुन योगी सरकारला इशारा दिलाय. उत्तर प्रदेश पोलिसांना प्रियंका गांधी यांना सोडावंच लागेल. जर त्यांनी प्रियंका गांधींना सोडलंन नाही तर आम्ही राज्यभर जेलभरो आंदोलन करु, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
” आता भाजपकडून सगळ्या विषयांचा हिशोब घ्यायची वेळ आलीय “
नाना पटोले म्हणाले, “उत्तर प्रदेश पोलिसांना प्रियंका गांधी यांना सोडावंच लागेल. जर त्यांनी प्रियंका गांधींना सोडलं नाही तर आम्ही राज्यभर जेलभरो आंदोलन करु. भाजपचं शेतकरी विरोधी धोरणं वारंवार समोर येतंय. महाराष्ट्रात सातत्याने ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, समुद्री वादळांची परिस्थिती आहे. यामध्ये केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे राज्यांना देणं लागतं, पण भाजपा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होताना बघते आहे. त्यावरच ते राजकारण करत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या विषयांचा हिशोब घ्यायची वेळ आलीय. यांना किती शेतकऱ्यांचा बलिदान हवंय? म्हणूनच पुढील काळात वेळ आल्यास जेलभरो आंदोलनही करु.”
“गोळ्या चालल्या, गाडीनं शेतकऱ्यांना चिरडलं तो अपघात कसा होऊ शकतो?”
“ज्या ठिकाणी गोळ्या चालल्या, आंदोलनाच्या ठिकाणी गाडीने चिरडलं तो अपघात कसा होऊ शकतो? भाजपा हा खोटारडा पक्ष आहे. शेतकऱ्यांना संपवून वर रेटून खोटं बोलायचं ही भाजपची परंपरा आहे. हेच यातून स्पष्ट होतंय,” असंही नाना पटोले यांनी सांगितलं.
“आता मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करावं”
नाना पटोले म्हणाले, “भाजपाने देशात शेतकरी विरोधी व्यवस्था तयार करुन ठेवली आहे. याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. लखीमपूर खेरीत झालेल्या घटनेविरोधात आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांसोबत उभं राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तातडीने दोषींवर कारवाई झाल्या नाहीत, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र बंद करण्याची हाकही देणार आहोत. आता केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकार बरखास्त करावं अशी मागणी आम्ही करतो आहोत.”
“भाजपाचा देशाचं मूळ असलेल्या शेतकऱ्यालाच संपवण्याचा निर्णय”
“शेतकरी या देशाचं मूळ आहे. भाजपाला शेतकऱ्यांचं विटंबन करण्याचा अधिकार दिलेला नाही. देशाचं मूळ असलेल्या शेतकऱ्यालाच संपवण्याचा निर्णय भाजपनं केला असेल तर मोदी सरकार आणि योगी सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेस करेल,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
“उचला लाठ्या आणि…”, आंदोलक शेतकऱ्यांविरोधात हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान