मुंबई : देशात कोणत्याही शिक्षण संस्थेला माजी विद्यार्थ्यांने दिलेल्या देणगीचा नवा विक्रम ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक आणि अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी रचला आहे. आयआयटी मुंबई या प्रथितयश अभियांत्रिकी संस्थेला ३१५ कोटींची देणगी दिली आहे. त्यांनी यापूर्वीही ८५ कोटींची देणगी दिली होती.
अभियंते आणि तंत्रज्ञ घडविणाऱ्या ‘आयआयटी मुंबई’मध्ये १९७३ साली विद्युत अभियांत्रिकीची पदवी मिळविण्यासाठी निलेकणी सर्वप्रथम दाखल झाले.
आपल्या नात्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी आयआयटीला ही मोठी देणगी देऊ केली आहे. या देणगीमुळे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना मिळेल, असा विश्वास आयआयटी मुंबई आणि निलेकणी यांनी संयुक्त निवेदनाद्वारे व्यक्त केला. याबाबत प्रतिक्रिया देताना निलेकणी म्हणाले, की या प्रतिष्ठित संस्थेशी सहवासाची ५० वर्षे साजरी करत असून या संस्थेने दिलेल्या योगदानाबाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो. या संस्थेने मला खूप काही दिले असून उद्याचे नवे जग घडविणाऱ्या विद्यार्थ्यांप्रति ही संस्था वचनबद्ध आहे.
देणगीचे महत्त्वाचे फायदे
आयआयटी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि नवउद्यम क्षेत्रांतील संशोधनाला चालना
आयआयटी मुंबईच्या विस्ताराला लक्षणीयरीत्या गती
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रस्थानी जाण्यास मदत
आयआयटी मुंबई ही माझ्या आयुष्यातील एक कोनशिला आहे. या संस्थेने माझ्या सुरुवातीच्या वर्षांना आकार दिला आणि माझ्या औद्योगिक प्रवासाचा पाया रचला. ही देणगी केवळ आर्थिक साहाय्य नसून या संस्थेला मानवंदना आहे.- नंदन नीलेकणी, सहसंस्थापक, इन्फोसिस